गोव्यातील उद्योगधंद्यांमध्ये आणखीन वाढ झाली पाहिजे. गोमंतकीयांनी केवळ खनिज आणि पर्यटनावर अवलंबून राहू नये. केंद्रीय मंत्रालय गोव्यात उद्योगधंद्यांमध्ये वाढ करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे. त्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाचे गोव्यात कार्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दोनापावला येथील राजभवनातील नवीन दरबार सभागृहात आयोजित एमएसएमई अधिवेशनात बोलताना काल केली.
केंद्रीय मंत्रालयाच्या योजना, तंत्रज्ञान, व्यवसाय यासंबंधीची सर्व माहिती गोव्यातील नागरिकांना या कार्यालयात उपलब्ध करून दिली जाईल, असेही राणे यांनी सांगितले.
गोवा राज्यातील सुमारे ९६ टक्के उद्योग हे सूक्ष्म श्रेणीतील आहेत. या क्षेत्रामध्ये वाढीची प्रचंड क्षमता आहे. त्यांनी सर्व सूक्ष्म उद्योगांना लघू श्रेणीत वाढ करण्याचे आणि सर्व लघु उद्योगांनी मध्यम श्रेणीत वाढ करण्याचे आवाहन राणे यांनी केले.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याचे दरडोई उत्पन्न ४.५ लाख रुपये असले, तरी तेथील नागरिकांनी विकसित राष्ट्रांनी प्राप्त केलेल्या पातळीशी बरोबरी करण्याचा विचार केला पाहिजे. केंद्राने एमएसएमई मंत्रालयाला ५ लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. राज्यातील जनतेने उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन राणे यांनी केले.
गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विविध प्रकारचे उद्योग सुरू करण्याची गरज आहे. सर्वांनी केवळ पर्यटन व्यवसायावर अवलंबून राहून चालणार नाही. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना मिळणार आहे. गोव्यातील एमएसएमई क्षेत्राच्या प्रतिनिधींना केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांचा वापर करून त्यांचे व्यवसाय आणि गोव्याची अर्थव्यवस्था वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.