- – धीरज गंगाराम म्हांबरे
मैदानावरील कामगिरीचा विचार केल्यास भारतासाठी सरलेले वर्ष हे परिवर्तनाची आशा दाखवून सुरू झाले होते. परंतु, या वर्षाचा शेवट मात्र आव्हानात्मक स्थित्यंतराची चाहूल देऊन गेला.
पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीच्या कलात्मक षटकारांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या चाहत्यांमधील एकसंधता दाखवून दिली. हा एक प्रमुख क्षण वगळल्यास टीम इंडियाने सरलेल्या वर्षात आनंदाचे मोजकेच क्षण पाहिले. मैदानावरील कामगिरीचा विचार केल्यास भारतासाठी सरलेले वर्ष हे परिवर्तनाची आशा दाखवून सुरू झाले होते. परंतु, या वर्षाचा शेवट मात्र आव्हानात्मक स्थित्यंतराची चाहूल देऊन गेला.
२०२२ मध्ये टीम इंडिया ही गोंधळलेल्या स्थितीतच अधिक असलेली जाणवली. मैदानावर व मैदानाबाहेरील नकोशा कारणांनीच हे वर्ष वाया गेले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल प्रसारण हक्कांनी ४८,००० कोटी रुपयांची कमाई केली. याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पकड बीसीसीआयने अधिक घट्ट केली. पण, मैदानावर मात्र भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी हे वर्ष खूप काही शिकवून गेले.
२०२२ या वर्षाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवाने झाली, ज्यामुळे निराश झालेल्या विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा त्याग केला. विराटला यानंतर तडकाफडकी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले. सन्मानाने या पदाचा त्याग करण्याची कोहलीची तयारी असताना त्याला विश्वासात न घेता हटविण्यात आले. त्यामुळे त्याचे बीसीसीआयशी याच कारणास्तव बिनसले. वर्षाची सुरुवात कोहली कर्णधारपदाचा त्याग करण्यापासून झाली तर शेवट रोहित शर्माला टी-ट्वेंटी क्रिकेटमधील कर्णधारपदाचा वारसदार म्हणून हार्दिक पंड्याच्या निवडीने झाली. नेतृत्व बदल झाला.
अष्टपैलू हार्दिक पंड्या हा टी-ट्वेंटी संघाचा नवीन नेता म्हणून उदयास आला. रोहितला टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर बाहेर जाण्याची जबर किंमत कर्णधारपद सोडून मोजावी लागली.
इंग्लंडचा संघ हा ब्रेंडन मॅक्कलम प्रशिक्षक व बेन स्टोक्स, जोस बटलर कर्णधार झाल्यापासून अन्य कुठल्याही देशापेक्षा वेगळ्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहे. पराभवाची पर्वा न करता कोणत्याही स्थितीत विजयासाठी प्रयत्न करायचे असे सूत्र त्यांनी अवलंबले आहे. याचा जबरदस्त फायदा त्यांना झाला. भारताला मात्र त्यांच्या या अनोख्या शैलीविरुद्ध खेळताना पर्यायांची कमतरता जाणवली.
द्विपक्षीय सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक झाली. परंतु जागतिक स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी ढेपाळलेली दिसली. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर कोहलीने शतकांचा दुष्काळ संपवताना अफगाणिस्तान (टी-ट्वेंटी) व बांगलादेश (वनडे) यांच्याविरुद्ध ठोकलेल्या शतकांचे अप्रूप फारसे राहिले नाही.
हारिस रौफच्या चेंडूवर कोहलीने लगावलेला तो सरळ षटकार अनेक वर्षे स्मरणात राहणार आहे. कोहलीच्या या फटक्याप्रमाणेच रोहित शर्मा व के. एल. राहुल यांनी टी-ट्वेंटीमध्ये पारंपरिकतेची न सोडलेली कास भारतीय क्रिकेट चाहत्यांना कायम सलत राहणार आहे.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे अचंबित करणारे निर्णयदेखील भारताच्या २०२२ मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुमार कामगिरीस जबाबदार आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी पूर्ण तंदुरुस्त नसतानादेखील जसप्रीत बुमराहला घाईघाईने पाठवल्यामुळे त्याची दुखापत अधिक चिघळली. त्यामुळे त्याचे लांबलेले पुनरागमन अजूनपर्यंत झालेले नाही.
लेसस्पिनर युजवेंद्र चहलला विश्वचषक स्पर्धेसाठी नेऊन एकाही सामन्यात न खेळविण्याचा निर्णयदेखील भुवया उंचावणारा ठरला. डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादवसारख्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार मिळूनही पुढील कसोटीसाठी डच्चू देण्याचा निर्णयदेखील वादग्रस्त ठरला.
रोहितच्या बाबतीत त्याची रुळावरून घसरलेली गाडी भारतासाठी चिंतेचा विषय ठरली. आघाडी फळीतील तीन खेळाडूंपैकी केवळ रोहितने आपल्या तंत्रात बदल करत यश मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, क्वचितच त्याच्या वाट्याला ते आले. संघातील जागा निश्चित नसताना राहुलला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी कर्णधार नेमून निवड समितीने वर्षाचा शेवटदेखील गोंधळाने केला. वर्षातील या शेवटच्या मालिकेतली राहुलने अपेक्षेप्रमाणे निराश केले. २०२३ या नवीन वर्षातील मालिकेसाठी टी-ट्वेंटीचे उपकर्णधारपद सूर्यकुमारकडे सोपविण्यात आले आहे. हार्दिक पंड्याकडे वनडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे खांदेबदलांमुळे भारतीय क्रिकेटला नवीन दिशा, यश मिळण्याची अपेक्षा केली जात आहे.
२०२२ या वर्षात श्रेयस अय्यरने अजिंक्य रहाणेमुळे रिक्त झालेले कसोटी संघातील स्थान आपलेसे केले. कसोटीतील पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत नावारूपास आला. सूर्यकुमारने टी-ट्वेंटीमध्ये आपल्याला सध्यातरी पर्याय नसल्याचे दाखवून दिले. सरलेल्या वर्षात इशांत शर्मा आणि वृध्दिमान साहा या दोन खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अंतही झाला.
महिला क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटची दीर्घकाळ सेवा केलेल्या मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी आपापल्या गौरवशाली प्रवासाचा शेवट केला.
मितालीची पोकळी भरून काढणारे अनेक फलंदाज असले तरी, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाची उंचावत असलेली कामगिरी शुभ संकेत देणारी आहे. तर झुलनची जागा शोधणे कठीण होईल. रेणुका सिंग ठाकूर सोडल्यास नवोदितांना अजून बरीच मजल मारायची आहे. शिखा पांडेचे १५ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे हे त्याचेच उदाहरण आहे.