नववर्ष, सनबर्न महोत्सवात ४३ मोबाईल चोरांना अटक

0
10

>> संशयितांकडून १३४ मोबाईल फोन ताब्यात

राज्यात नववर्ष आणि सनबर्न संगीत महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर गोव्यातील कळंगुट, वागातोर, हणजूण आदी किनारी भागात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करून सुमारे ४३ मोबाईल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून १३४ मोबाईल फोन ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.

या पार्श्‍वभूमीवर राज्यातील किनारी भागात पर्यटकांची लुबाडणूक करणारे दलाल, गैरव्यवहारावर नियंत्रण आणण्यासाठी पर्यटन पोलीस विभाग आणखी मजबूत करण्याची गरज आहे.
राज्यातील किनारी भागातील गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी मोबाईल चोरटे मोठ्या संख्येने गोव्यात आले होते. गोवा पोलिसांनी चोरट्यांविरोधात जोरदार कारवाईची मोहीम सुरू केल्याने अनेक चोरटे भूमिगत झाले.

राज्यात पर्यटन पोलीस विभागाची कित्येक वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली आहे. तथापि, या विभागात पोलीस कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. गोवा पोलिसांच्या आयआरबी या राखीव बटालियनमधील पोलिसांची समुद्र किनार्‍यावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पर्यटकांना दलालांचा मनःस्ताप

उत्तर गोव्यातील कळंगुट, हणजूण, वागातोर, बागा आदी किनारी भागात दलालांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पर्यटकांना दलालांचा मनःस्ताप सहन करावा लागतो. या दलालांकडून पर्यटकांच्या लुबाडणुकीचे प्रकार घडतात. राज्य सरकारकडून किनारी भागात गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाईची घोषणा केली जाते. तथापि, या घोषणेची योग्य कार्यवाही होत नाही. किनारी भागात पर्यटन पोलीस विभागासाठी कर्मचारी वर्ग अपुरा आहे.

पर्यटन पोलीस विभाग कार्यक्षम करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. पर्यटन पोलीस विभागासाठी सुमारे साडेचारशे पोलीस नियुक्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.