>> विरोधी आमदारांच्या मागणीनंतर सभापती रमेश तवडकर यांचे स्पष्टीकरण; कामकाज व्यवस्थितपणे चालवणे हेच आपले काम
विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवावा, अशी मागणी केल्यानंतर काल सभापती रमेश तवडकर यांनी याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजाचे दिवस किती असावेत त्याचा निर्णय सभापती घेत नसून, सदर निर्णय सरकार घेत असते आणि कामकाज सल्लागार समिती या कामकाजाला मान्यता देत असते, असे रमेश तवडकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
विरोधी पक्षाच्या सर्व सातही आमदारांनी सोमवारी विरोधी पक्षनेत्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेत हिवाळी अधिवेशन किमान २ आठवड्यांचे घ्यावे, अशी मागणी केली होती. तसेच या मागणीच्या पाठपुराव्यासाठी सभापती आणि राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही स्पष्ट केले होते.
विरोधी आमदारांनी विधानसभा कामकाजाच्या कालावधीच्या प्रश्नावरून आपल्यावर आरोप करू नयेत. सभापतींचे काम हे विधानसभेचे कामकाज हे योग्यरितीने व व्यवस्थितपणे चालावे हे पाहण्याचे असते, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.
दुसर्या बाजूला आमदार विजय सरदेसाई यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सभापती रमेश तवडकर हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कर्मचारी असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप केला होता. त्यावर काल पत्रकार परिषदेत बोलताना तवडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली.
सभापती हे मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी असल्याप्रमाणे वागत आहेत असा आरोप करुन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपला तसेच सभापतिपदाचा अपमान केला असून, त्यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी रमेश तवडकर यांनी केली.
जोपर्यंत ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत आपण विरोधी आमदारांना भेटीसाठी वेळ देणार नसल्याचे काल त्यांनी स्पष्ट केले.
…. तोपर्यंत विरोधी आमदारांना भेटणार नाही
सभापती रमेश तवडकर यांनी विरोधी आमदारांना विधानसभा अधिवेशनाच्या प्रश्नी चर्चेसाठी बोलावले होते; मात्र सोमवारी विजय सरदेसाई यांनी तवडकर यांच्यावर ते मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप केल्याने संतप्त बनलेल्या तवडकर यांनी विजय सरदेसाई हे जोपर्यंत आपली माफी मागत नाहीत, तोपर्यंत आपण विरोधी आमदारांना चर्चेसाठी भेटणार नसल्याचे काल स्पष्ट केले.