राज्यातील पंचायत क्षेत्रातील विविध प्रकारच्या कचरा हाताळणीमध्ये लवकरच सुधारणा केली जाणार आहे. पंचायत संचालनालयाने कचरा व्यवस्थापनात सुधारणा करणारा गोवा मॉडेल पंचायत घनकचरा २०२२ च्या उपविधीचा मसुदा जाहीर केला आहे.
या उपविधीच्या माध्यमातून पंचायतीमधील कचरा हाताळणीमध्ये सुधारणा शक्य आहे. उपविधीचा मसुदा एक महिना खुला ठेवण्यात येणार आहे. या मसुद्यासंबंधी सूचना, हरकती एका महिन्याच्या आत पंचायत संचालनालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पंचायत क्षेत्रातील सर्व प्रकारच्या कचर्याचे विभाजन करून गोळा केला जाणार आहे. कचरा हाताळणीमध्ये मोठी सुधारणा केली जाणार आहे. कचरा विभक्त करून विल्हेवाटीसाठी द्यावा लागणार आहे. सर्व प्रकारचा कचरा गोळा केला जाणार असून, कचरा शुल्काच्या आकारणीचा प्रस्ताव आहे. वैयक्तिक, घरगुती कचर्यासाठी अ, ब गटातील प्रतिमहिना ७५ रुपये, क गटातील पंचायतींकडून ६० रुपये, ड गटातील पंचायतींकडून ४५ रुपये प्रति महिना शुल्क आकारले जाणार आहे. पंचायत क्षेत्रातील विविध व्यावसायिक, हॉस्पिटल, दवाखान्यांकडून शुल्काची आकारणी केली जाणार आहे.