किनारी भागात सुरक्षेसाठी ‘पर्यटकरक्षक’

0
15

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; लवकरच भरती होणार

राज्यातील किनारी भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग आणि पर्यटकांना मदत करण्यासाठी होमगार्डच्या धर्तीवर पर्यटकरक्षक (टुरिस्टगार्ड) तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस मुख्यालयात गृह खात्याच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. पर्यटकरक्षकांची भरती लवकरच केली जाईल. पर्यटकांची सतत ये-जा असलेल्या किनारी भागांत पर्यटकरक्षक तैनात केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. यावेळी पोलीस महासंचालक जसपाल सिंग व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात कायदेशीर डान्सबार नाहीत. जर कोणी बेकायदेशीरपणे डान्सबार चालवत असेल, तर लोकांनी कायदा हातात घेऊ नये. कारवाईसाठी पोलिसांशी संपर्क साधावा. या बेकायदा व्यवसायात गुंतलेल्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यात टॅक्सी ऑपरेटर्सची दंडेलशाही सुरू असून, पर्यटकांची सतावणूक खपवून घेतली जाणार नाही. नागरिक आणि पर्यटकांनी टॅक्सी ऑपरेटर्सच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, त्याची त्वरित दखल घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पर्यटकांनी फसवणूक टाळण्यासाठी पर्यटन खात्याकडे नोंदणी असलेल्या हॉटेलमध्येच बुकिंग करावे. बेकायदा हॉटेलमध्ये नोंदणी करू नये. पर्यटन खात्याच्या वेबसाईटवर नोंदणीकृत हॉटेलची यादी उपलब्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या परदेशी नागरिकांच्या हद्दपारीच्या बाबतीत गोवा देशात आघाडीवर आहे. विविध गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने अमलीपदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आलेल्या ७०० परदेशींपैकी ६५० जणांना आधीच हद्दपार करण्यात आले आहे आणि उर्वरित ५० जणांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलांकडे दुचाकी, चारचाकी वाहने देणार्‍या वाहनमालकांवर वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. वास्को येथे दोन अपघाताची प्रकरणे घडली आहेत. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे वाहने देऊ नयेत. तसेच मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहीम पुन्हा सुरू केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

…तर ‘ती’ वाहने जप्त करणार
राज्यात पर्यटकांना खासगी दुचाकी, कारगाड्या भाडेपट्टीवर दिल्या जात आहेत. खासगी वाहने पर्यटकांना भाडेपट्टीवर दिली जाऊ शकत नाही. पर्यटकांकडे खासगी दुचाकी, कारगाड्या आढळून आल्यास त्या जप्त करण्यात येतील. सदर वाहने परत दिली जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.