काले खाणपट्टा फोमेंतो कंपनीकडे

0
22

खाणपट्‌ट्यांच्या लिलावाच्या पहिल्या टप्प्यातील चौथा आणि शेवटचा काले-सांगे येथील खाणपट्टा फोमेंतो कंपनीने काल लिलावात मिळवला. दरम्यान, खाण खात्याकडून पुढील पंधरा दिवसांत आणखीन ७ खाणपट्‌ट्यांचा लिलाव जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती खाण खात्याच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील पहिल्या टप्प्यातील खाणपट्‌ट्यांच्या लिलावात चारही खाणपट्टे गोव्यातीलच खनिज कंपन्यांनी मिळविण्यास यश प्राप्त केले आहे. या लिलावात एकूण अकरा खनिज कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यात गोव्याबरोबर परराज्यातील बड्या खनिज कंपन्यांचा सुध्दा सहभाग होता.

काले सांगे येथील खाणपट्टा १५७ हेक्टरचा आहे. दोन खाणपट्टे एकत्र करून हा खाणपट्टा तयार करण्यात आला आहे. फोमेंतो कंपनीने हा खाणपट्टा ८६.४० टक्क्यांवर घेतला आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने परराज्यातून आणण्यात येणारे खनिज मुरगाव बंदरातून निर्यात करण्यास परवानगी देण्यासाठी कायद्यात दुरुस्तीला मान्यता दिली आहे. आता, परराज्यातून खनिज आणून मुरगाव बंदरातून निर्यात करण्यास मिळणार आहे. राज्य सरकारला खनिजाच्या टनापोटी पन्नास रुपये सेस मिळणार आहे.