मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण मनोहर पर्रीकर असे करण्याऐवजी ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे जे करण्यात आले आहे, त्यात गैर असे काही नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. काल मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमानंतर ते बोलत हेाते.
पणजीतील नव्या मांडवी पुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिलेले आहे; पण आम्ही पुलाचे अटलबिहारी वाजपेयी असे नामकरण केलेले नसून, ‘अटल सेतू’ असे नामकरण केलेले आहे; मात्र त्यावेळी एकाही व्यक्तीने या नावाला आक्षेप घेतला नव्हता, ही बाब तानावडे यांनी निदर्शनास आणून दिली.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजना हे आणखी एक उदाहरण होय. दीनदयाळ स्वास्थ्य योजना, राजीव कला मंदिर ही आणखी काही उदाहरणे होत. या योजनांना दिलेली ही नावे पूर्ण नाहीत, असे तानावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका हेमा सरदेसाई यांनी काल मनोहर परींकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचा सर्वांगिण विकास केल्याचे सांगितले. मोप विमानतळाच्या नामकरणावरही त्यांनी भाष्य केले. मोपचे नामकरण मनोहर असे केल्याने फार मोठी चूक झाली आहे असे नाही. मात्र, मनोहर पर्रीकर असे नामकरण केले असते, तर ते योग्य झाले असते, असेही सरदेसाई म्हणाल्या.
भाजपकडून पर्रीकरांचा अपमान : कुतिन्हो
मोप विमानतळाचे मनोहर पर्रीकर असे नामकरण न करता मनोहर असे नामकरण केल्याने निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हे दिसत नसून, काल आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी यासंबंधी बोलताना मोप विमानतळाला मनोहर पर्रीकर असे नाव न देता केवळ मनोहर असे नामकरण करून भाजपने मनोहर पर्रीकर यांचा अपमान केला आहे, असे सांगितले.