पुढील वर्षापासून पर्रीकरांच्या नावे युवा शास्त्रज्ञ पुरस्कार

0
10

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन; पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नावाने राष्ट्रीय स्तरावरील युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्याचा सरकारचा मानस असून, पुढील वर्षापासून युवा शास्त्रज्ञांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली. राज्य सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याने भारत सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे देशातील नामवंत शास्त्रज्ञांचा शोध घेण्यात मदत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
विज्ञान, तंत्रज्ञान खात्यातर्फे दोनापावला येथे आयोजित चौथ्या ‘मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवा’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस विज्ञान महोत्सव म्हणून दरवर्षी पाळण्यात येत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना त्यांच्या हृदयाच्या जवळ होत्या. राज्यभरातील पाच हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होत असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे १७ शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या महोत्सवामुळे विद्यार्थी आणि शिक्षक समाजामध्ये वैज्ञानिक विचार रुजवतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कोरलेल्या गोमंतकीय वंशाच्या डॉ. अँड्रिया कुलासो ह्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर भाषण देतील, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून वैज्ञानिक विचार रुजविण्याचे मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते, असे मोन्सेरात म्हणाले. विज्ञानाशी संबंधित उपक्रमांसाठी शाळांसाठी विविध योजना आणि धोरणे तयार केली जात आहेत. खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्य नवोपक्रम परिषद स्थापन करण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत, असेही ते म्हणाले.

या महोत्सवाचा सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना फायदा होईल. राज्याच्या विकासात पर्रीकरांचे मोठे योगदान आहे. हा महोत्सव विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्यास मदत करील. हा महोत्सव केवळ विज्ञानाच्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून आपल्या सर्वांसाठी आहे, असे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल म्हणाले.