मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

0
12

>> हिमाचलमध्ये तिघे शर्यतीत; गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल पुन्हा मुख्यमंत्रिपदी शक्य

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलेल्या कॉंग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्रिपद कुणाला दिले जाणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह, निवडणूक प्रबंधन समितीचे अध्यक्ष सुखविंदर सिंह सुक्खू आणि ज्येष्ठ नेते मुकेश अग्निहोत्री यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी चुरस आहे. दुसर्‍या बाजूला गुजरातमधील यशानंतर भूपेंद्र पटेल हे पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची दाट शक्यता आहे.

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह या मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. राज्यातील वरिष्ठ नेते सुक्खू यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्याच्या विरोधात आहेत. प्रतिभा सिंह याच त्यांची पहिली पसंती असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्या खासदार असल्याने मुख्यमंत्री झाल्यास त्यांना पुन्हा निवडून यावे लागेल. विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले मुकेश अग्निहोत्री सलग पाच वेळा निवडून आले आहेत, तेही मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

काल कॉंग्रेसचे हिमाचल प्रभारी राजीव शुक्ला, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी हिमाचलच्या राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला; पण त्यांच्यासोबत राज्यातील एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुजरातमध्ये काय?
गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सादर केला. गुजरातमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्री राहतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे पटेल हेच नवे मुख्यमंत्री असतील, अशी दाट शक्यता आहे.

समर्थकांमध्ये धक्काबुक्की

हिमाचल प्रदेश कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून घमासान माजले आहे. काल झालेल्या बैठकीला कॉंग्रेस प्रभारी राजीव शुक्ला, निरीक्षक भूपेश बघेल व भूपेंद्र हुड्डा हे उपस्थित होते. यावेळी प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी कॉंग्रेस कार्यालयाला घेराव घातला. त्यांनी प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली. यावेळी प्रतिभा सिंह आणि सुखविंदर सुक्खू यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे वातावरण तापले.