>> सांबा जिल्ह्यात स्फोटके, शस्त्रे, रोकड जप्त
>> पाकिस्तानी ड्रोनवर संशय
जम्मूमध्ये पोलिसांनी दहशतवादी कट उधळला. जम्मूमधील सांबा जिल्ह्यात गुरुवारी पोलिसांना एक बंद पाकिट जप्त केले. त्यात स्फोटके, शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात रोकड पोलिसांना सापडली. पाकिस्तानी ड्रोनने ही पाकिटे टाकली असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे स्फोटक पदार्थ काही मोठ्या घटनेला पार पाडण्यासाठी टाकण्यात आले होते. आमच्या टीमने दहशतवाद्यांचा हा कट उधळून लावला आहे, असे सांबाचे एसएसपी अभिषेक महाजन यांनी सांगितले.
सांबा येथील विजयपूरच्या एका शेतात हे पाकिट पोलिसांना सापडले. सदर जागी पाकिट पडले असल्याची माहिती काल सकाळी ६ वाजता एका व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. या पाकिटात ५ लाख रुपये रोख, २ चायनीज पिस्तूले, ४ मॅगझिन, एक स्टील आयईडी अशा वस्तू सापडल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. आयईडी आणि रोख रक्कम मिळाल्यानंतर लष्कराने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
दहशतवाद्यांना अटक
दरम्यान, पोलीस आणि सुरक्षा दलांनी २२ नोव्हेंबर रोजी बांदीपोरा येथे लष्कराचे दोन सक्रिय दहशतवादी आणि एका महिलेसह दोन साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा, आयईडी तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
कोट्यवधींची मालमत्ता जप्त
सुरक्षा दल आणि तपास संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जवळपास आणखी २०० मालमत्तांची यादी तयार केली जात असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. तपासात या संपत्तीचा अतिरेकी फंडिंगशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात यूएपीएअंतर्गत कारवाई केली जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडे केलेल्या काश्मीर दौर्यात अतिरेकी आणि त्यांना सहानुभूती दाखवणार्यांवर कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ही कारवाई सुरू केली आहे.
तळ हलवले
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे सीमेपलीकडील अतिरेक्यांनी आपले तळ जम्मू क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय सीमेकडे वळवले आहेत. गुप्त माहितीनंतर लष्कर व सुरक्षा रक्षकांनीही धोरण बदलले आहे.