नवीन झुआरी पुलावर साकारणार २७० कोटी खर्चून टॉवर, गॅलरी

0
19

>> बांधकाम विभागाकडून निविदेचे प्रकाशन : रोषणाई, पार्किंग व्यवस्थेचा समावेश

राज्यातील झुआरी नदीवरील आठ पदरी केबल-स्टेड नवीन पुलावर अंदाजे २७० कोटी रुपये खर्चून टॉवर आणि व्ह्यूइंग गॅलरी बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या झुआरी पुलावरील एका चौपदरी भागाचे काम पूर्ण झाले असून एक भाग वाहनांच्या वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. या पुलाचा दुसरा चौपदरी भाग वर्ष २०२३ अखेरपर्यंत पूर्ण केला जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नवीन झुआरी पुलावरील टॉवर आणि व्ह्यूइंग गॅलरी बांधण्यासाठी सुमारे २७०.०७ कोटी रुपयांची निविदा प्रकाशित केली असून निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ आहे. नवीन झुवारी पुलावर टॉवर आणि व्ह्यूइंग गॅलरीबरोबरच डेकोरेटीव्ह लायटींग, पार्किंगची व्यवस्थेचा निविदेमध्ये समावेश आहे.

नवीन झुआरी केबल-स्टेड पुलाचे बांधकाम दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून केले जात आहे. हा पूल ६४० मीटर लांबीचा असून ३६० मीटरचा मध्यवर्ती स्पॅन आहे. तसेच दोन्ही बाजूला १४० मीटरचा शेवटचा स्पॅन आहे. नवीन झुआरी पुलाच्या एक चौपदरी भागाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आलेली आहे. येत्या डिसेंबर महिन्यापूर्वी नवीन पुलाच्या एका भागाचे उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी म्हटले आहे. झुआरी नदीवरील नवीन केबल स्टेड पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर जुन्या झुआरी पुलावरील ताण कमी होणार आहे. वाहतुकीत सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. सध्या जुन्या झुआरी पुलावर ताण वाढलेला आहे. वाढत्या वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. झुआरी पुलाचे काम वर्ष २०२१ मध्ये पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तथापि, कोरोनामुळे कामाला विलंब झाला. कंत्राटदार कंपनीने या पुलाच्या बांधकामासाठी चीन सल्लागार नियुक्त केला होता. कोरोना महामारीच्या काळात चीनमधील सल्लागार भारतात येऊ शकला नाही. अखेर, कंपनीने भारतातील सल्लागाराच्या मदतीने पुलाचे काम सुरू केले.