वेदना

0
45
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

आजच्या जगात वेदना प्रामाणिक मनाची मैत्रीण असते. कोणच प्रामाणिक व्हायला तयार नाही हे पाहणेच अतिशय वेदनामय असते. प्रामाणिकपणाशिवाय समाज म्हणजे डोके नसलेले धड; जसे हे धड निर्जीव, तसाच समाजदेखील निर्जीव.

प्रस्तुत वेदना ही शरीराची वेदना नाही तर मनाची वेदना आहे. अश्‍वत्थाम्याची डोक्यावरील जखम भळभळत राहिली व त्यातून जन्मणारी मनाची वेदना शेवटपर्यंत त्याची सोबतीण बनून राहिली. शरीराची वेदना आपण रडत-आक्रंदत सहन करतो, पण मनाची वेदना सहनशीलतेच्या पलीकडची असते. मनाची वेदना कधी पश्‍चात्तापाची असते, कधी अपयशाची असते, तर कधी छळ व निंदेची असते. ही वेदना सूक्ष्म असते. ती आपल्याला जाणवत राहते, पण दुसर्‍याला सांगता येत नाही, दाखवता येत नाही व स्पष्ट करणेही जमत नाही.

राम गणेश गडकर्‍यांच्या ‘एकच प्याला’ नाटकात दारूड्या सुधाकरचा नातेवाइकांकडून वेळोवेळी अपमान होतो. या अपमानाची वेदना असह्य होऊन पतिव्रता सिंधूने दुर्गेचे रूप घेतले आणि सगळ्या आप्तेष्टांशी संबंधच कठोरपणे तोडून टाकले.
आपले ‘पावित्र्य’ जनशंकेचे कारण झालेले पाहून अतिवेदनेने व्याकूळ झालेल्या सीतेने अग्नीत प्रवेश करून अग्निदिव्य केले आणि शेवटी तर भूमातेला आवाहन करून भूमीच्या पोटातच प्रवेश केला. वेदनेचा कळस एवढा महाभयंकर की सीतेने स्वतःलाच कायमचे मिटवून टाकले.

क्रॉसवर हातापायांना खिळे ठोकले जात असताना आणि जखमांतून रक्ताचे पाट वाहत असताना, येशूची शरीराच्या वेदनेपेक्षा मनाची वेदना अतिशय खोल होती. म्हणूनच तर त्याच्या तोंडून शब्द उमटले- ‘हे प्रभू! यांना माफ कर. हे काय करताहेत ते त्यांनाच समजत नाहीय!’
जिझस क्राइस्टने प्रस्थापित सत्तेविरुद्ध बंड पुकारले. रंजल्या-गांजलेल्यांची सोबत आयुष्यभर केली. दुःखितांचे अश्रू पुसले. गरिबांच्या दुःखावर मायेने व करुणेने फुंकर घातली. जे सत्य हयातभर या भूमीवर त्यांना प्रस्थापित करता आले नाही, तेच सत्य त्याच्या बलिदानाने जनमानसात अजरामर झाले. ज्या क्रॉसवर त्याने जीवन संपवले तोच क्रॉस समर्पणाचे प्रतीक बनून जनमानसाचा ‘आधार’ बनला.

लहानसहान अपयशाची वेदना ही तात्पुरती असते. माणूस आपल्या जीवनात खूप ठिकाणी अपयशी ठरतो; पण त्या अपयशातून, होणार्‍या वेदनेतून तो शिकतच राहतो. अपयशाची वेदना ही मार्गदर्शक बनून जीवनात उभे कसे राहावे याचा अनुभव देते. अपयशातून माणूस जो धडा घेतो तोच पुढील जीवनात त्याचा मार्गदर्शक बनतो. त्याला आपल्या ध्येयाची अचूक दिशा सापडते.
शहराच्या अथवा महाशहराच्या प्रचंड गर्दीमध्ये माणूस आतून एकटाच असतो. एकलेपणाची वेदना जोपासतच तो गर्दीमध्ये राहतो. प्रत्येकाचे दुःख, व्यथा, परिस्थिती, विवंचना वेगवेगळी… यातून जन्मणार्‍या वेदना निरनिराळ्या… या वेदनांचे कारुण्य गौतम बुद्धांना अतिशय तीव्रतेेने जाणवले. वेदनेने माणूस केवढ्या टोकापर्यंत पोहोचू शकतो हे त्याच्या जीवनातून आपल्याला शोधता येईल. यशोधरा ही त्याची सुंदर पत्नी होती. राहुल हा नुकताच जन्मलेला राजपुत्र होता. राजवैभव व राजसत्ता त्याच्या पायाशी लोळण घेत होती. सगळी सुखे हात जोडून समोर उभी होती. कोणत्याच गोष्टीचा अभाव नव्हता. पण एवढे सगळे सहज उपलब्ध असताना प्रचंड धाडसाने सर्वस्वाचा त्याग करून गौतम बुद्ध वनवासी कसे झाले? वेदनेचे सामर्थ्य एवढे अचाट असते की जे कोणत्याही महाशक्तीला करता येत नाही ते वेदनेचे अतिकोमल कारुण्य करून दाखवते!

वेदनेमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सरही नसतो. सहाही षड्‌रिपू चार हात अंतरावर असूनदेखील वेदनेची तरलता आपल्याला आकर्षित करते. हिंदी भाषेतील कवयित्री महादेवी वर्मा यांची वेदना जगावेगळीच होती. त्यांच्या चिंतनामध्ये जे त्यांना जाणवले ते त्यांनी आपल्या काव्यात व्यक्त केले. त्यांचा एकलेपणाचा सूर कवितेच्या ओळी-ओळीमध्ये प्रकट होतो. वैयक्तिक वेदना अभिव्यक्त झाल्यावर तिचे रूपांतर सामूहिक वेदनेत होते. रसिकांना ही कविता वाचताना ती आपलीच सुप्तावस्थेत असलेली जुनी वेदना वाटायची. कवयित्रीच्या अनुभवाशी वाचक समरस व्हायचे. वेदनेची ही भुरळ रसिकांच्या चिंतनशक्तीला साद घालायची. वेदनेच्या चमत्कारिक किमयेने गंभीर व गूढात्मक साहित्याकडे सामान्य रसिक आकर्षित व्हायचा.
शिळा होऊन पडलेल्या अहिल्येची वेदना अतिशय कठीण स्वरूपाची होती. प्रत्यक्ष देवानेच पती गौतमाचे रूप घेऊन तिला फसवले. तिचा कोणताही दोष नव्हता तरी पती गौतमाने तिला शिळा होऊन पडण्याचा शाप दिला. एकपत्नी प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श झाल्यावर तिचा उद्धार झाला व तिला मूळ स्त्रीरूप प्राप्त झाले. शाप भोगताना त्या कालखंडातील तिच्या वेदनेचे स्वरूप किती यातनामय होते त्याचा अंदाज येतो.

विषाचा पेला तोंडाला लावला, गटागटा वीष प्याली, तरी संत मीराबाईला मरण आले नाही. श्रीकृष्णाची भक्ती करता-करता तीच कृष्णस्वरूप झाली. आपल्या कृष्णमय वेदनेचा अर्थच मीराला कळला नाही. याच्या उलट सोक्रेटिसने जबरदस्तीने दिलेला विषाचा पेला पोटात रिकामा करताच त्याचे प्राणपाखरू लगेच उडून गेले. मृत्यूची वेदना कशी असते हेदेखील त्याला कळले नाही.
आजच्या जगात वेदना प्रामाणिक मनाची मैत्रीण असते. कोणच प्रामाणिक व्हायला तयार नाही हे पाहणेच अतिशय वेदनामय असते. प्रामाणिकपणाशिवाय समाज म्हणजे डोके नसलेले धड; जसे हे धड निर्जीव, तसाच समाजदेखील निर्जीव.