तुये-पेडणे येथे वर्ष २०१९ मध्ये चिर्यांच्या खाणीत बुडून मृत्यू पावलेल्या ४ शाळकरी मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १६ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाचा (एनजीटी) निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरला आहे.
तुये येथील चिर्यांच्या खाणीत पेडणे येथील डॉन बॉस्को विद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांच्या बुडून झालेल्या मृत्यू प्रकरणाची एनजीटीने स्वेच्छा दखल घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना ६ टक्के व्याजाने प्रत्येकी १६ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता.
गोवा सरकारच्या खाण खात्याने एनजीटीच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. एनजीटीने माणुसकीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय दिला असून, त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एनजीटीच्या निवाड्यात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन आव्हान याचिका फेटाळून लावली.