गव्हासह सहा पिकांसाठी किमान हमीभाव जाहीर

0
14

>> केंद्र सरकारची घोषणा; मसूरसाठी सर्वाधिक ५०० रुपयांची, तर गव्हासाठी ११० रुपयांची वाढ

केंद्र सरकारने येत्या रब्बी हंगामासाठी किमान हमीभाव म्हणजे एमएसपी जाहीर केले आहेत. गव्हाचा एमएसपी २०१५ रुपयांवरुन २१२५ क्विंटल म्हणजे ११० रुपयांनी वाढवला आहे, तर हरभर्‍याच्या एमएसपीमध्ये १६३५ वरुन १७३५ म्हणजे १०५ रुपयांची वाढ केली आहे. गहू, हरभर्‍याप्रमाणेच इतर महत्वाच्या सहा रब्बी पिकांचा एमएसपी वाढवला आहे.
मसूरचा एमएसपी सर्वाधिक ५०० रुपये वाढून ६ हजार रुपये क्विंटल झाला आहे, तर मोहरीचा एमएसपी ४०० रुपयांनी वाढवला आहे. करडईचा एमएसपी ५ हजार ४४१ होता, तो २०९ रुपयांनी वाढून ५ हजार ६५० रुपये क्विंटल झाला आहे.
सन २०२३-२४ सालासाठी सहा रब्बी पिकांच्या किमान हमी भावाच्या वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले. त्यानुसार मसूरच्या किमतीत दर क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गव्हाच्या किमतीत ११० रुपयांची, हरभर्‍याच्या किमतीत १०५ रुपयांची आणि मोहरीच्या किमतीत ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पिकांच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, दरम्यान, कृषी खर्च आणि किमती आयोगाकडून (सीएसीपी) सध्या २३ पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो. त्यामध्ये ७ अन्नधान्य पिके, ५ डाळी, ७ तेलबिया आणि ४ व्यावसायिक पिकांचा समावेश आहे.
एमएसपी कोण ठरवते?
खरीप आणि रबी पिकाचा एमएसपी वर्षातून दोनदा ठरवला जातो. कृषी खर्च आणि किमती आयोग म्हणजे सीएसीपी या संबंधित केंद्र सरकारकडे शिफारस करतो. त्या आधारे दरवर्षी तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि आणि इतर पिकांचा एमएसपी घोषित केला जातो. या शिफारशी लक्षात घेऊन सरकार एमएसपी जाहीर करते.

एमएसपी म्हणजे काय?

एमएसपी म्हणजे किमान हमीभाव किंवा किमान आधारभूत किंमत. या किमतीला सरकार शेतकर्‍यांकडून त्यांच्या पिकांची खरेदी करते. एकदा का एखाद्या पिकाला किमान हमीभाव जाहीर केला, तर त्या किमतीखाली त्या पिकाची खरेदी करता येत नाही. किमान तेवढ्या किमतीला संबंधित पीक खरेदी करणे सरकारला बंधनकारक असते. किमान हमीभावामुळे शेतकर्‍यांना एक प्रकारचे आश्वासन मिळते, दिलासा मिळतो.