कोण होणार कॉंग्रेसचा अध्यक्ष?

0
6

>> आज फैसला, निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार मल्लिकार्जून खर्गे आणि खासदार शशी थरूर असे दोन दिग्गज नेते आमनेसामने आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा विजय होणार आणि कोण कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

कॉंग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण असणार, हे बुधवार दि. १९ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होईल. कॉंग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी २४ वर्षांनंतर प्रथमच निवडणूक झाली. मतदान प्रक्रिया देशभरात राबवण्यात आली. तसेच भारत जोडो यात्रेच्या शिबिरामध्येही मतदानासाठी विशेष सोय करण्यात आली होती.

देशभरातील ९ हजार ५०० हून अधिक कॉंग्रेस प्रतिनिधींनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले होते. मतदानानंतर सीलबंद मतपेट्या दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. बुधवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतपत्रिका एकत्र केल्या जातील. त्यानंतर ५० टक्क्यांहून अधिक मते मिळविणार्‍या उमेदवाराची कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड केली जाईल.
या निवडणुकीत आपला विजय होईल असा विश्वास असल्याचे मत शशी थरुर यांनी व्यक्त केले आहे, तर ही मैत्रीपूर्ण लढत होती, असे मत खर्गे यांनी व्यक्त केले आहे.