अमलीपदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) काल आंतरराज्य अमलीपदार्थ माफियांकडून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. हे ड्रग्स गोव्यासह अन्य काही राज्यांत पाठवण्यासाठी आणले जात होते, असे तपासात समोर आले आहे. दिल्ली व मुंबई येथे टाकलेल्या छाप्यात हे ड्रग्स काल जप्त करण्यात आले. तीन छाप्यांपैकी दोन ठिकाणी जप्त केलेले ड्रग्स हे गोव्यात पाठवण्यासाठी आणले होते, अशी माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत छापा टाकून जप्त केलेल्या ७ किलो कोकेनची किंमत ३५ कोटी रुपये एवढी असून, ते गोव्यात पाठवण्यासाठी आणले होते. या प्रकरणी चार विदेशी नागरिक व एका भारतीयाला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथील छाप्यात २ किलो कोकेनसह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून एमडीएमए, एलएसडी, हशिश तेल हस्तगत करण्यात आले.