खरेच बदल घडेल?

0
18

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काल मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात निवडणूक झाली. देशभरातील ६५ मतदानकेंद्रांवर घेण्यात आलेल्या ह्या मतदानातील मतपेट्या दिल्लीला रवाना होतील आणि दिल्लीत बुधवारी निकाल जाहीर होईल. अर्थात, आतापर्यंतची परिस्थिती लक्षात घेतल्यास खर्गे हे अप्रत्यक्षपणे का होईना, गांधी घराण्याचा पाठिंबा असलेले उमेदवार असल्याने त्यांचा विजय जवळजवळ निश्‍चित दिसतो. शशी थरूर हे पक्षात ‘बदल घडविण्यासाठी’ म्हणून जरी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले असले, तरी त्यांची ‘२३ बंडखोर नेत्यांमधील एक’ ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता, मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी घराण्याचा वरदहस्त असलेले उमेदवार ठरले आहेत. त्यामुळे सोनिया आणि राहुल यांच्याप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी कॉंग्रेसजन खर्गेंच्या पारड्यात बहुसंख्येने मतदान करतील असे दिसते.
अशोक गेहलोत यांना पुढे आणण्याचा कॉंग्रेस श्रेष्ठींकडून झालेला प्रयत्न, नंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावे लागेल म्हणून त्यांनी आपल्या समर्थकांकरवी अप्रत्यक्षपणे फडकवलेले बंडखोरीचे निशाण, त्यामुळे अवमानीत झालेल्या कॉंग्रेस नेतृत्वाने त्यांचा काढून घेतलेला पाठिंबा, ह्या संधीचा फायदा उठवण्यासाठी पुढे सरसावलेले दिग्विजयसिंह, परंतु त्यांच्यासारखा वाचाळ नेता अध्यक्ष बनला तर पुढे तापदायक ठरू शकेल ह्या जाणिवेपोटी अकस्मात पुढे आणली गेलेली खर्गेंची उमेदवारी हा सगळा घटनाक्रम बोलका आहे.
खर्गे हे जरी पक्षाध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असले, तरी पदोपदी ते गांधी घराण्याप्रतीची आपली निष्ठा कंठरवाने व्यक्त करीत आले आहेत. ‘सोनिया गांधी ह्याच पक्षाच्या खर्‍या नेत्या असतील, गांधी घराण्याच्या मार्गदर्शनाखालीच कॉंग्रेसची यापुढची वाटचाल सुरू राहील’ ही त्यांची चाललेली भाषा पाहिली तर उद्या ते निवडून आले तरी पक्षाचा रिमोट कंट्रोल गांधी घराण्याकडेच देतील असे दिसते. गांधी घराण्याला तर तेच हवे आहे. राहुल यांना प्रत्यक्ष जबाबदारी नको आहे, परंतु पक्षाच्या कारभारामध्ये ढवळाढवळ मात्र करायची आहे. सध्याच्या भारत जोडो यात्रेद्वारे त्यांनी आपले अप्रत्यक्ष नेतृत्व कॉंग्रेसजनांच्या मनावर ठसवण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे तो काही उगाच नव्हे.
सोनिया गांधी गेली २२ वर्षे कॉंग्रेस अध्यक्षपदावर राहिल्या. त्यांच्या प्रकृतीच्या गंभीर तक्रारी सुरू होताच काही काळ राहुल गांधींकडे अध्यक्षपद देऊन पाहण्यात आले, परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या दणक्याने राहुल एवढे गलितगात्र झाले की बैठक सोडून ते जे गेले, ते पुन्हा पक्षाध्यक्षपदाकडे फिरकलेदेखील नाहीत. त्यामुळे पक्षाचे अधिकृत पद न स्वीकारता, परंतु अनधिकृतपणे पक्षाच्या सर्व निर्णयांवर वर्चस्व गाजवत ते वावरत आलेले आहेत. त्यामुळे गुलाम नबी आझादांसारखे ज्येष्ठ नेते पक्ष सोडून चालते झाले, तेव्हा त्यांनी पत्रातून मांडलेली वस्तुस्थिती बोलकी आहे. आतादेखील खर्गेंच्या रूपाने एक कळसूत्री बाहुलीच कॉंग्रेसला लाभणार असे दिसते.
शशी थरूर हे भले उच्चशिक्षित असले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी मोठमोठी पदे भूषविली असली, लेखक व विचारवंत म्हणून त्यांचा नावलौकीक असला, तरीदेखील खर्गेंच्या पाच दशकांच्या राजकीय अनुभवाच्या तुलनेत ते नवखेच ठरतात. शिवाय कॉंग्रेस पक्षातील त्यांचा प्रवेश तसा फार जुना नाही. त्यामुळे खर्गेंसारख्या तळागाळातून वर आलेल्या गुलबर्ग्याच्या नेत्यापुढे थरूर तुल्यबळ आव्हान निर्माण करू शकण्याची शक्यता फार कमी आहे. आपला पराभव त्यांनाही दिसू लागला असावा. काल थरूर यांनी एक ट्वीट केले. त्यात त्यांनी ‘‘कुछ लडाईया हम इसलिए भी लडते है, कि इतिहास याद रख सके की वर्तमान मूक न था’’ असा एक शेर फेकला आहे. ते ठिकठिकाणी प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणींना भेटायला गेले, तेव्हा बहुतेक ठिकाणी त्यांचे अतिशय थंडे स्वागत झाले. सोनियांची इतराजी ओढवू नये म्हणून बहुतेक प्रदेश कॉंग्रेस पदाधिकार्‍यांनी त्यांना भेटणेही टाळले. त्यामुळे हा सामना समान पातळीवरून होत नसल्याची ओरड थरूर यांनी आतापासूनच सुरू केलेली दिसते. मतपत्रिकेमध्येही पहिल्या क्रमांकावर खर्गेंचे नाव असल्याने त्यालाही थरूर गटाने आक्षेप घेतला आहे. वास्तविक, ह्या लढाईमध्ये उतरण्याचा निर्णय थरूर यांनी घेतला, तेव्हाच आपल्याला असमान परिस्थितीत ही निवडणूक लढावी लागणार आहे ह्याची जाणीव त्यांना असायला हवी होती. मुळात कॉंग्रेस पक्षसंघटनेचे कितीही पानीपत जरी होत असले, तरी बहुसंख्य पदाधिकार्‍यांना पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी केवळ आपल्याला आजवर पुढे आणलेल्या गांधी घराण्याशी निष्ठा राखणेच अधिक महत्त्वाचे दिसते. हा निकालही तेच सांगेल!