>> मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट
मोदी सरकारने ब्रिटिश पारपत्रधारकांसाठीच्या व्हिसा नियमांत बदल केल्याने ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या शक्य तेवढ्या लवकर दूर करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली भेटीत आपणाला दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन या मुद्यावर चर्चा केली होती. त्यानंतर काल गोव्यात परतल्यानंतर त्यांनी या भेटीचा तपशील दिला. अमित शहा यांच्याशी खाणपट्ट्यांचा लिलाव, निर्यात शुल्क आदी प्रश्नांवरही चर्चा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ब्रिटनहून गोव्यात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे अनेक चार्टर्ड विमाने रद्द करण्यात आलेली असून, त्याचा मोठा फटका गोव्याच्या पर्यटनाला बसणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शहा यांनी व्हिसा नियम बदलांमुळे निर्माण झालेला गुंता शक्य तेवढ्या लवकर सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.