अरुणाचल प्रदेशमधील तवांगजवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’चा काल अपघात झाला. या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला असल्याची माहिती लष्करी अधिकार्यांनी दिली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू या ठिकाणी अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. अपघातानंतर दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी गंभीर जखमी झालेल्या एक वैमानिक लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसर्या पायलटवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.