‘लम्पी’ हा त्वचारोग झालेली आठ गुरे आतापर्यंत राज्यात सापडली आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी आगुस्तिनो मिस्किता यांनी काल दिली.
त्वचारोग झालेली एकूण १५ गुरे राज्यात सापडली असून, त्यापैकी ८ गुरांना लम्पी हा त्वचारोग झाल्याचे हाती आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे, असे मिस्किता यांनी सांगितले. त्वचारोग झालेली जास्तीत जास्त गुरे ही फोंडा तालुक्यातील आहेत, तर काही गुरे ही डिचोली तालुक्यातील असल्याची माहिती त्यांनी दिली. गुरांना हा त्वचारोग होऊ नये, यासाठी २०१९पासून गुरांना लस टोचण्याचे काम सुरू आहे. यंदा गणेशचतुर्थीच्या आधीपासून नव्याने लस टोचण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे मिस्किता यांनी सांगितले. लम्पी हा रोग राजस्थानातील गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला असून, पशुसंवर्धन खात्याला कल्पना न देता परराज्यांतून गोव्यात गुरे आणली जात असल्याने हा रोग येथील गुरांमध्येही पसरू लागल्याचे ते म्हणाले. उत्तर गोव्यात परराज्यांतून गुरे आणण्यावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.