काही दिवसांपूर्वी प्रतापनगर, हरवळे-साखळी येथे पाच बांगलादेशी नागरिक सापडल्यानंतर काल बोर्डे-डिचोली येथे एका शेताजवळच उभारलेल्या खोल्यांतून चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. दहशतवादविरोधी पोलीस पथकाने ही कारवाई केली.
हे चारही जण बोर्डे-डिचोली येथील एका व्यक्तीच्या जागेत वास्तव्यास होते. तसेच ते भंगार गोळा करण्याचे काम करत होते. अन्वर अखोन अबू हसन (५०), हसन चांद नियान (३८), नुरजहा बेगम चांद नियान (३४) व राजा अखोन (२२, सर्व रा. उत्तर राजापूर, बांगलादेश) येथील आहेत. त्यांच्याकडे भारतीय आधाकार्ड आढळून आले असून, त्याच्या आधारे ते देशात आणि गोव्यात भ्रमंती व वास्तव्य करत आहेत. त्यातील अन्वर अखोन हा दर दोन वर्षांनी बांगलादेशला भेट देतो, तर हसन चांद नियान याने गेल्या चार वर्षांपूर्वी बांगलादेशला भेट दिली होती.
डिचोलीतील बोर्डे येथे सदर बांगलादेशी कुटुंब राहत होते. सदर जागेत लहान-लहान ११ खोल्या असून, त्यातील अर्ध्या खोल्यांमध्ये राहणारे सर्व परप्रांतीय असून, ते सर्वचजण भंगार व प्लास्टिक बाटल्या गोळा करण्याचे काम करतात. या बांगलादेशी कुटुंबासमवेत राहणारे परप्रांतीय हे कोलकाता-पश्चिम बंगाल येथील आहेत. हे सर्व जण ग्रामीण भागांमध्ये आणि शहरात फिरून भंगार गोळा करतात आणि नंतर ते बड्या भंगारवाल्यांना विकतात.
दशहतवादविरोधी पथकाला या ठिकाणी बांगलादेशी राहत असल्याची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. आता त्यांना विदेश नोंदणी अधिकार्यांसमोर सादर करून बांगलादेशला पाठविण्याचे सोपस्कार करण्यात येणार आहेत.