दिगंबर कामतांसह भाजपला मोठा धक्का

0
22

>> मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप समर्थित उमेदवाराचा पराभव; कामतांवर देवाची ‘अवकृपा’

‘पक्षांतरासाठी देवाचा कौल आहे’, असा दावा करत भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या आमदार दिगंबर कामत यांना दुसर्‍याच दिवशी जोरदार धक्का बसला. भाजप आणि कामत यांचा पाठिंबा लाभलेल्या मडगाव मॉडेलच्या दामोदर शिरोडकर यांचा मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. भाजप समर्थक १५ नगरसेवक असून देखील पराभवाला सामोरे जावे लागल्याने दिगंबर कामत यांच्यासह भाजपची मोठी निराशा झाली. १५ मते मिळवून फातोर्डा फॉरवर्ड गटाचे घन:श्याम शिरोडकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले.

काल झालेल्या मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक घन:श्याम शिरोडकर यांनी मडगाव मॉडेलचे दामोदर शिरोडकर यांच्या विरोधात १५-१० मतांनी विजय मिळविला. भाजप नगरसेवकांमध्ये फूट पडल्याने दामोदर शिरोडकर यांचा पराभव झाला.
मडगाव पालिकेत २५ सदस्य असून, भाजपचे ९, मडगाव मॉडेलचे ७, फातोर्डा फॉरवर्डचे ८ व अपक्ष १ असे बलाबल आहे. या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक घन:श्याम शिरोडकर यांना फातोर्डा फॉरवर्ड गटाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचे संख्याबळ ९ झाले. तसेच आणखी ६ भाजप नगरसेवकांनी घन:श्याम शिरोडकर यांच्या बाजूने मतदान केल्याने ते निवडून आले.

आमदार दिगंबर कामत यांचे मडगाव मॉडेल व आमदार विजय सरदेसाई यांच्या फातोर्डा फॉरवर्डने पालिका निवडणुकीआधी युती केली होती. त्यांचे १७ नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीनंतर पहिल्या १५ महिन्यांसाठी फातोर्डा फॉरवर्डच्या लिंडन परेरा यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी या पदाचा हा राजीनामा दिला होता. मध्यंतरी घन:श्याम शिरोडकर यांनी मडगाव मॉडेलला, तर श्‍वेता लोटलीकर यांनी फातोर्डा फॉरवर्डला सोडचिठ्ठी दिली. दुसर्‍या बाजूला अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश आमोणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे संख्याबळ ८ झाले होते. त्यानंतर श्‍वेता लोटलीकर यांच्या प्रवेशाने हे संख्याबळ ९ पर्यंत पोहोचले.

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरताना घन:श्याम शिरोडकर यांना दोन भाजप नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. तसेच मडगाव मॉडेलचाही त्यांना पाठिंबा होता. आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये गेल्याने फातोर्डा फॉरवर्ड व मडगाव मॉडेल यांच्यातील युती फिस्कटली. त्यामुळे समीकरणे बदलली. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी आमदार दामू नाईक आणि माजी मंत्री बाबू आजगावकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मडगाव मॉडेल व भाजपच्या १६ नगरसेवकांची बैठक घेऊन दामोदर शिरोडकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते, त्याप्रमाणे त्यांनी संमतीही दिली होती.

काल सकाळी ११ वाजता निवडणूक अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावले यांनी प्रक्रिया सुरू करताच भाजपचे नगरसेवक सदानंद नाईक यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी आणखी अर्धा तास दिल्यानंतर उर्वरित दोघा उमेदवारांपैकी एकानेही अर्ज मागे न घेतल्याने मतदान प्रक्रिया सुरू झाली. त्यात घन:श्याम शिरोडकर यांना १५, तर दामोदर शिरोडकर यांना १० मते पडली. घन:श्याम शिरोडकर यांना १५ मते पडल्याचे समजताच भाजपमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आमदार विजय सरदेसाई यांनी पालिकेत येऊन घनश्याम शिरोडकर यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्र्यांनी आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेत त्यांना भाजप उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले होते; पण त्या आवाहनाचा केराची टोपली दाखवत सहा जणांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात मतदान केले आणि दिगंबर कामतांसह भाजपला धक्का दिला. कालच्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व दामू नाईक यांनी बंडखोरावर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

दिगंबर कामत यांना कौलप्रसाद नाही : सरदेसाई

मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग केल्याने दिगंबर कामत पुरस्कृत दामोदर शिरोडकर यांचा सपशेल पराभव झाला. हा पराभव शिरोडकर यांचा नसून, हे राजकीय परिवर्तन आहे. त्यात कामत यांना एक प्रकारे कौलप्रसाद मिळालेला नाही हे स्पष्ट होत आहे, अशी आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेली शिष्टाई व्यर्थ गेली. कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर दोन दिवस उलटण्यापूर्वीच कामत यांना पालिकेतील वर्चस्व गमवावे लागले. दामोदर शिरोडकर निवडून यावे, म्हणून मुख्यमंत्र्यांनी रात्री ११ वाजेपर्यंत मडगाव विश्रामगृहात भाजप नगरसेवकांची मनधरणी केली; पण त्यांना यश आले नाही, असे सरदेसाई म्हणाले. निवडीनंतर नगराध्यक्ष घन:श्याम शिरोडकर, विजय सरदेसाईंसमवेत पिंपळकट्ट्यावर गेले व श्री दामोदर देवाचे दर्शन घेतले. यावेळी आपण मडगाव शहराच्या विकासासाठी झटणार असल्याचे घन:श्याम शिरोडकर यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपचे १५ नगरसेवक असताना उमेदवाराला फक्त १० मते पडल्याने भाजपमध्ये बंडखोरी झाल्याची कबुली मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सर्वांना बोलावून समज दिली, असेही ते म्हणाले.