छळ

0
7
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

छळाला दोन पदर असतात. अंतर्गत व बहिर्गत. अंतर्गत छळ हा न दिसणारा असतो. बहिर्गत छळ हा सर्वांना दिसणारा असतो. आज छळ करणार्‍यांचा पुढे छळ होतो, हे सत्य कधीच बदलत नाही. कारण जगाचे चक्र नेहमी बदलतच राहते.

छळाला दोन पदर असतात. अंतर्गत व बहिर्गत. अंतर्गत छळ हा न दिसणारा असतो. बहिर्गत छळ हा सर्वांना दिसणारा असतो. छळ पाहणारा क्षणभर तरी दुःखाच्या आवेगाने हळहळत असतो.
मागच्या काळातील राजे-महाराजे युद्धात हरलेल्या सैनिकांना कैदेत ठेवत असत. त्यांचा विविध मार्गांनी छळ होत असे. मनासारखे जेवण मिळायचे नाही. राहायला समाधानकारक जागा नाही. मोकळ्या हवेत फिरायचे नाही. एकमेकांशी गरजेशिवाय बोलायचे नाही. अंधारकोठडीतील शिक्षा तर जीवघेणी असायची. अंधाराशिवाय दुसरा सोबती नाही. प्रकाशकिरण पाहायला जीव आसुसलेला असायचा. सहजासहजी जीव जात नाही म्हणून आला दिवस ढकलायचा. हा कोंडमारा मरणोन्मुख यातनांचा. या छळाला मर्यादाच नाही. कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली देणे, हात-पाय तोडणे, डोके छाटणे, उकळत्या तेलाच्या काहिलीत फेकणे, दगडांनी ठेचून मारणे अशा त्या अमानुष शिक्षा असायच्या.

गोव्यातील पोर्तुगिजांच्या कैदेत शारीरिक छळ असह्य असायचा. कैद्यांना आडवे पाडून बुटांच्या पायांनी चिरडले जायचे व बेहोष करायचे. लाथा-बुक्क्यांच्या माराने त्यांना घायाळ करायचे. भिंतीला डोके आपटले जायचे. फुटले तरी पर्वा करायची नाही. डोक्याचा चमनगोटा करून- त्याच्यावर डांबर घालून- हात पाठीमागच्या बाजूला बांधून भर रखरखत्या उन्हात त्याला तासन्‌तास उभे ठेवायचे. हेतू हा की डांबर तापून डोक्याला चटके बसावेत. दिवसभर सक्तमजुरीची कठीण कामे द्यायचे, अन्न न देता उपाशी ठेवायचे, तहानेने घसा कोरडा पडला तरी प्यायला पाणी द्यायचे नाहीत. धुराच्या कोठडीत बंद ठेवायचे. बर्फाच्या चेंबरमध्ये ढकलले जायचे. आगीचे चटके अंगावर दिले जायचे. कावलमारीचा मार असह्य असायचा. धडाधड हाणणारा रबरी दांडा भयानक असायचा. लोखंडी चिमट्यांचादेखील प्रहार व्हायचा. असा जळफळाट भोगतच कैद्याने जगायचे. दया, करुणा, माणुसकी यांचा जरादेखील अंश छळ करणार्‍यांच्या अंगी नसायचा. चार पायांचे पशू या दोन पायांच्या छळणार्‍या माणसांपेक्षा कित्येक पटींनी बरे असे म्हटले तर गैर ठरू नये, अशी एकूण हलाखीची परिस्थिती होती. हे आत्म-अनुभवाचे चटके स्व. श्यामराव मडकईकर या वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकाने एकदा आपल्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितले होते.

औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या केलेल्या छळाला दुसरी उपमाच नाही. डोक्याला काटेरी मुकुट घालून, गाढवावरून धिंड काढून, त्यांचे डोळे काढून हाल-हाल करून शरीराच्या चिंध्या केल्या. जिवंतपणी चामडी सोलताना संभाजी महाराजांचा जीव कधी उडून गेला हे कोणालाच कळले नाही. असा दारुण प्रसंग याच्यापुढेदेखील कोणाच्याच जीवनात येऊ नये. दुष्टपणाची व क्रूरतेची हद्द ओलांडलेला आणि या विश्‍वातील माणुसकीला काळिमा फासणारा हा छळ होता असेच नाइलाजाने म्हणावे लागेल. हा झाला बहिर्गत छळ.

अंतर्गत छळ हा मानसिक असतो. आतल्या आत सुस्कारे सोडत हाय-हाय करत हा छळ सोसायचा असतो. जो अगदी सरळ स्वभावाचा व निष्कपट असतो त्याला कपटी व कारस्थानी माणसे विविध मार्गांनी छळत असतात. विनाकारण असत्य, गंभीर आरोप अंगावर ढकलून देतात. जी कल्पनादेखील मनामध्ये कधी आणली नाही अशा भयानक आरोपांच्या गोळ्या भराभर अंगावर झाडून त्याला घायाळ केले जाते. या भयानक संकटाच्या तावडीतून सुटण्यासाठी परमेश्‍वराशिवाय दुसरा रक्षणकर्ताच नसतो. आपण केले काय आणि झाले काय याच्यावर विचार करताना त्याची ससेहोलपट होते.

आजच्या कुटुंबप्रमुखाच्या होणार्‍या छळाला काय म्हणावे हेच कळत नाही. स्वतः कर्जाचा डोंगर डोक्यावर पेलत सगळ्यांच्या गरजा पाहिल्या. कोणाचे पालन-पोषण, तर कोणाचे शिक्षण तर कोणाची लग्ने, तर मधूनच डोकावणारे कित्येकांचे विविध आजार यांना तोंड देईपर्यंत नाकी नऊ यायचे. एवढी सगळी होरपळ झाल्यावर कर्ज फेडायला हातभार लावणारा कोणीच नसतो. कर्जाचे पैसे सगळ्यांनी खाल्ले आणि ते भरताना कुटुंबप्रमुखाच्या सोबतीला मात्र कुणीच नसतो. कर्तव्याच्या मार्गाने पुढे जाणार्‍याचाच शेवटी बळी जातो. नव्या युगाची ही शोकांतिका थोपवणार कोण?
जो ‘इतरांसाठी’ दिवस-रात्र राब राब राबला; ते ‘इतरजणच’ एकत्र येऊन आपला कंपू करतात व त्यांच्यासाठी राबणार्‍यालाच वाळीत टाकतात. संधी मिळाल्यास त्याच्यावर शिव्यांचा पाऊस पाडतात. आपले कोठे चुकले हे त्या बिचार्‍याला शोधताच येत नाही. ‘देवा तू डोळे उघड’ असे म्हणून देवाला शरण जाण्यावाचून त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो.

अशी का बरे वागतात आजची शहाणी-सुरती माणसे? सभ्यपणाचा खोटा बुरखा मिरवताना जरादेखील अपराधाची भावना त्यांच्या अंतर्मनात सलत नाही?
ज्या आप्तेष्टांचा उज्ज्वल भविष्यकाळ घडवण्यासाठी आपण आजवर चिंतन करीत राहिलात तेच आप्तेष्ट शत्रूंच्या गोटात सामील होऊन आपलाच उद्धार करायला लागले, त्यांना कोणत्या शब्दांत खरी अक्कल आपण देऊ शकाल? अक्कलदाढा दातांमध्ये फार उशिरा येतात असे म्हणतात. आपल्याच माणसांना जर अक्कल नसेल तर दुसर्‍याला दोष कसा बरे देता येईल?
चांगले घडवायला गेलेल्याचा जर असा छळ होत असेल तर नवीन माणसांना चांगले घडवण्याची प्रेरणा कोठून बरे मिळणार? कितीही छळ झाला तरी चांगल्या मूल्यांचा पराजय होता कामा नये. आज छळ करणार्‍यांचा पुढे छळ होतो, हे सत्य कधीच बदलत नाही. कारण जगाचे चक्र नेहमी बदलतच राहते.