गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्याने आता पाच वर्षे विरोधात बसावे लागेल म्हणून अस्वस्थ झालेले कॉंग्रेसचे बरेच आमदार काहीही करून सत्ताधारी पक्षात शिरण्यासाठी कंबरेचे
सगळे सोडून केव्हापासून कुंपणावर बसले होते. पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्रतेपासून वाचण्यासाठी दोन तृतियांशांच्या संख्याबळाची असलेली आवश्यकता पूर्ण होताच काल पक्षांतराची ती औपचारिकता पूर्ण केली गेली एवढेच. जनतेला ह्याचा ना धक्का बसला, ना कौतुक वाटले. आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या ह्या निर्लज्ज विकाऊ वृत्तीची लाज मात्र नक्कीच वाटली!
गेल्या जुलै महिन्यात २०१९ मधील घाऊक पक्षांतराच्या स्मृतिदिनीच कॉंग्रेसचे आठ वीर पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटेचा फायदा उठवत भाजपवासी होणार होते. काहीजण तर अगदी मुख्यमंत्री बंगल्यापर्यंतही जाऊन पोचले होते. परंतु एका आमदाराची सद्सद्विवेकबुद्धी जागी झाल्याने म्हणा, किंवा खरे तर पुढच्या निवडणुकीत शेवटी मतदारांशी गाठ असेल आणि गेल्यावेळी ज्यांनी बंड केले ते नंतरच्या निवडणुकीत घरी बसले आहेत, ह्याची आठवण जवळच्यांनी करून दिल्याने म्हणा, तो शेवटच्या क्षणी मागे फिरला आणि गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्यांचे हसे झाले. पण मनाने भाजपात गेलेली ही मंडळी तेव्हापासून आठव्या गड्याच्या शोधात होती. अखेर हा आठवा गडी आतापर्यंत निष्ठावंताचा आव आणत राहिलेल्या संकल्प आमोणकरच्या रूपाने त्यांना मिळाला आणि आजवर खोळंबलेल्यांच्या पक्षांतराचे घोडे एकदाचे गंगेत न्हाले.
गेल्या निवडणुकीपूर्वी हिंदू आणि ख्रिस्ती देवतांपुढे रीतसर शपथा घेऊन पक्षांतराचे पाऊल न उचलण्याची ग्वाही ज्यांनी मतदारांना दिली होती, ते केवळ स्वार्थासाठी त्या शपथा चुलीत घालून कसे सत्तेच्या वाटेने निघाले ते मतदार अस्वस्थपणे पाहत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत जसे दहा बंडखोरांपैकी बहुतेकजण घरी बसले, तसे मतदार यांच्यातील बहुतेकांना घरी बसवण्याचीच अधिक शक्यता आहे, परंतु पुढील निवडणुकीला अद्याप भरपूर अवकाश असल्याने ‘पुढचे पुढे पाहू’ म्हणत ही मंडळी भाजपाच्या धावत्या गाडीत घुसली आहेत. कॉंग्रेस पक्षाची सध्याची केविलवाणी निर्नायकी स्थिती आणि पक्षाच्या पुनरुज्जीवनाची आणि राजकीय भवितव्याची सतत मावळत चाललेली आशा या पार्श्वभूमीवर भल्याभल्यांचा धीर सुटला तेथे पहिल्यांदाच निवडून आलेल्या नवागतांची काय कथा? कॉंग्रेस पक्षनेतृत्वही ह्या स्थितीला तेवढेच जबाबदार आहे. पक्षांतरांची संभाव्यता लक्षात घेऊन गेल्या निवडणुकीत प्रयत्नपूर्वक नवे चेहरे उतरवण्यात आले होते, परंतु शेवटी सगळे एकाच माळेचे मणी निघाले आहेत!
मायकल लोबो गेल्या निवडणुकीपूर्वी राज्यात सत्तांतराच्या आशेने कॉंग्रेसवासी झाले होते. आपला दबावगट निर्माण करण्याची त्यांनी त्या निवडणुकीत शिकस्त केली आणि डिलायला लोबो आणि केदार नाईक या आपल्या दोन मोहर्यांना निवडूनही आणले. पण निवडणुकीनंतर कॉंग्रेसची सत्ता काही आली नाही आणि विरोधात बसण्याची पाळी आली. भरीस भर म्हणून मंत्री विश्वजित राणे यांनी त्यांच्याविरुद्ध जमीन व्यवहारांच्या प्रकरणांत आघाडीच उघडली. लोबो यांच्यावर त्यामुळे भाजपात प्रवेशाचा दबाव वाढत गेला. ते भाजपात आले तरी त्यांना क्लीन चीट मिळायला भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन नव्हे, असे तेव्हा विश्वजित राणे भले जोशात म्हणाले होते, परंतु लोबोंना आधी दक्षता खात्याकरवी क्लीन चीट व नंतर पक्षात प्रवेश देऊन भाजप नेतृत्वाने महत्त्वाकांक्षी विश्वजितनाच त्यांची जागा व्यवस्थित दाखवून दिली आहे.
दिगंबर कामत हे खरे तर ज्येष्ठ व अनुभवी नेते. काही वर्षांपूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला असता तर नैसर्गिकरीत्या पुन्हा कदाचित मुख्यमंत्रीही बनले असते. आता एवढ्या ज्येष्ठ नेत्यावर मायकल लोबोच्या नेतृत्वाखाली भाजपात येण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यांच्यासाठी हे पक्षांतर मानहानीकारक आहे. या पक्षांतराची बक्षिसी म्हणून त्यांच्याविरुद्धचे जायका प्रकरण आता गुंडाळले जाईल हे उघड आहे.
नुवेचे आमदार आलेक्स सिकेरा भाजपात जावे की नाही याबाबत आपण संभ्रमात असल्याचे सांगत सुटले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात असल्याने त्यांना पुन्हा निवडून येण्याची चिंता नसावी. बाकी केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस
हे लिंबू टिंबू सत्तेच्या लाभासाठी ह्या गटात सामील झाले याचे आश्चर्य वाटत नाही. मायकल व दिगंबर यांना आपल्या मतदारांवर पूर्ण विश्वास असल्याने त्यांना पुढील निवडणुकीची चिंता नाही, पण ही जी बाकीची मंडळी आपलाही फायदा करून घ्यावा म्हणून भाजपात शिरलेली आहेत, त्यांचा पुढील निवडणुकीत काय निकाल लागतो ते आपण पाहणारच आहोत. पण तोवर तरी सत्तेची चैन चाखावी असा निव्वळ व्यवहारी विचार त्यांनी केलेला दिसतो. शेवटी स्वार्थ साधताना कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि मतदारसंघाचा विकास ही ठेवणीतली कारणे सांगता येतातच!
कालच्या घाऊक पक्षांतरामुळे कॉंग्रेसची अधिकच दारुण अवस्था झाली आहे. विधिमंडळ पक्षात कार्लोस परेरा, एल्टन डिकॉस्टा आणि युरी आलेमाव हे तिघेच शिलेदार आता उरले आहेत. तिकडे राहुल गांधी ‘भारत जोडो’ करीत आहेत आणि इकडे मुख्यमंत्री म्हणाले तशी ‘कॉंग्रेस छोडो’ यात्रा सुरू झाली आहे. कॉंग्रेसचे हे उरलेसुरले शिलेदार काय करतात, विशेषतः गेल्या विधानसभा अधिवेशनात चमकदार कामगिरी दाखवलेले स्वतः वैमानिक असलेले युरी आलेमाव पक्षाचे खाली खाली चाललेले विमान ह्या वादळातून कसे सावरतात ते पाहावे लागेल. आम आदमी पक्षाला ह्या घडामोडीचा फायदा मिळविण्याची आता संधी आहे. कॉंग्रेसला मत म्हणजे भाजपला मत हे आम्ही सांगत नव्हतो? अशी त्यांच्या प्रचाराची यापुढे दिशा राहील. आरजीनेही अद्याप विरोधात राहून मतदारांशी इमान राखले आहे.
कॉंग्रेसमधून नव्याने आलेल्या आठजणांंमुळे राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या आमदारांचे संख्याबळ आता थेट २८ वर गेले आहे. चाळीस आमदारांच्या विधानसभेत सत्ताधारी आघाडीपाशी ३३ आमदार असणे हे लोकशाहीच्या आणि गोव्याच्या हिताच्या दृष्टीने हिताचे म्हणता येणार नाही. राजकीय स्थैर्य एका मर्यादेपर्यंतच ठीक असते. ती मर्यादा ओलांडली गेली की सत्तेचा माज चढण्याची शक्यता बळावते. विरोधक दुबळे असतात तेव्हा तर धरबंदच राहत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सुज्ञ आहेत. सतत जमिनीला कान लावून आहेत. त्यामुळे आपले सहकारी ह्या सत्तेच्या नशेत बेताल आणि बेबंद होणार नाहीत यावर जातीने अंकुश त्यांना ठेवावाच लागेल.
आठ आमदारांच्या येण्यामुळे पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा मिळेल असे भाजप नेतृत्वाला वाटते. पण ह्या घाऊक पक्षांतरामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणेही आता बरीच बदलतील. आलेल्या पाहुण्यांना सत्तेचे लाभ मिळवून देण्यासाठी सध्याच्या एक दोन मंत्र्यांना मंत्रिपदावर पाणी सोडावे लागणार आहे. मगोचे मंत्रिपद धोक्यात येईल असे काहींना वाटते, परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत मगोची मते भाजपला आवश्यक असल्याने भाजपला स्वतःच्याच एक – दोन आमदारांची मंत्रिपदे काढावी लागतील असे दिसते. कॉंग्रेसमधून मोठ्या आशेने आलेल्या ह्या पाहुण्यांचे पुनर्वसन भाजप कसे करतो हे पाहावे लागेल. दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्यासाठी पक्षाने कोणते सोन्याचे ताट वाढून ठेवले आहे तेही लवकरच दिसेल. लोबो मंत्रिपदाविना राहू शकतील असे बिल्कूल वाटत नाही. उद्या नगरनियोजनच त्यांच्या पदरी आले तरी आश्चर्य वाटू नये!
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कॉंग्रेसच्या ह्या आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांच्या विरोधात वर्षानुवर्षे काम केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची स्थिती केवीलवाणी झाली आहे. कार्यकर्त्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्षे खस्ता खायच्या, पक्ष रुजवण्यासाठी परिश्रम घ्यायचे आणि निव्वळ राजकीय सोईपोटी त्यांच्या विरोधकांना पक्षात घेऊन त्यावर एकाएकी असे पाणी ओतायचे हा जो काही खेळ भाजप नेतृत्वाने बिनदिक्कत चालवलेला आहे, तो नजीकच्या राजकारणासाठी सोयीचा जरी असला तरी दीर्घकालीक वाटचालीसाठी मारकच ठरतो. गेल्या निवडणुकीतही ते दिसून आलेच आहे.
आता सरतेशेवटी एक प्रश्न. ह्या सगळ्या राजकीय घडामोडीतून जनतेचे काही हित साधले गेले आहे का? या प्रश्नाचे उत्तर अर्थात नकारार्थीच येते! ज्या मतदारांनी ह्या आमदारांना एका विशिष्ट भूमिकेखाली निवडून दिले, तीच खुंटीवर टांगून आणि आपल्याला मिळालेला कौल कशासाठी आहे याचे सोईस्कर विस्मरण करून घेऊन हे लोक पलीकडे जाऊन बसले आहेत. मतदारांच्या पाठीत हा सरळसरळ खंजीर खुपसला गेला आहे. मतदारसंघाच्या विकासाच्या वल्गना केल्याने आणि कार्यकर्त्यांच्या कल्याणाची आश्वासने दिल्याने त्याखालचा स्वार्थ आणि विकाऊ वृत्ती काही लपणारी नाही. पितृपक्ष संपण्याएवढाही धीर यांना धरवला नाही यावरून ही मंडळी किती घायकुतीला आली होती हे कळून चुकते. काल भरणी श्राद्धाच्या दिवशी ह्या आठजणांनी गोव्यात राजकीय नीतीमत्तेचे आणि लोकशाहीचेच जणू श्राद्ध घातले आहे!