चरावणे येथील लघु धरणाचे बंद पडलेले बांधकाम नव्याने हाती घेण्याचा सरकारचा विचार असून, जलसंसाधन खाते व वनखाते संयुक्तपणे हे काम हाती घेणार असल्याचे काल वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. त्यासाठी दोन्ही खाती राज्य वन्यजीव मंडळाशी याबाबत चर्चा करणार असून, ज्या कारणामुळे हे काम अडले होते, त्यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या विषयावर चर्चा करण्यासाठी येत्या १५ दिवसांच्या आत एक फेरआढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. वेगवेगळे प्रकल्प मार्गी लावणे व या प्रकल्पांना गती देणे यासाठी ही फेरआढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राणे यांनी यावेळी दिली.
काल वन खाते व जलसंसाधन खात्याची जी संयुक्त बैठक झाली, त्या बैठकीला जलसंसाधन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हेही हजर होते. या बैठकीला राज्याचे मुख्य वनपाल सौरभ कुमार, जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी व अन्य अधिकारी हजर होते.