उड्डाण पुलाच्या खांबावरून महिलेची सुटका

0
27

दाबोळी विमानतळाजवळील उड्डाण पुलाच्या खांबावरून काल एका महिलेची सुटका करण्यात आली. यावेळी उड्डाण पुलाखाली बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सदर महिला उड्डाण पुलाच्या खांबावर पोहोचलीच कशी? असा प्रश्न लोकांना पडला असून, या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण गोव्यात व्हायरल झाला आहे.

दाबोळी विमानतळाजवळ ग्रेड सेप्रेटरच्या खांबावर एक महिला बसल्याचे काही टॅक्सीचालकांच्या काल सकाळी निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्याची माहिती वास्को पोलिसांना दिली आणि अग्निशमन दलालाही पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून त्या खांबावर बसलेल्या महिलेला खाली उतरण्यास सांगितले. त्या महिलेला व्यवस्थित खाली उतरवल्यानंतर तिची चौकशी केली असता, आपल्याला काम मिळेल, असे सांगून कोणीतरी येथे आणून सोडले असल्याचे सदर महिलेने सांगितले. आपण कारवार येथील असून, आपले नाव स्नेहा नाईक असेही तिने सांगितले. आपल्याकडील पैसे कुणीतरी काढून घेतल्याचेही तिने सांगितले. मात्र तिला या ठिकाणी कुणी आणून सोडले. ती उड्डाण पुलाच्या खांबावर कशी काय चढली, हे मात्र तिने सांगितले नाही.

वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी स्नेहा नाईक यांच्या कारवार येथील कुटुंबाशी संपर्क साधून स्नेहाला नेण्याची विनंती केली; पण नातेवाईकांनी तिला नेण्यास नकार दिला. यानंतर वास्को पोलीस स्थानकात स्नेहा हिला शिरदोन-तिसवाडी येथील सरकारी मनोरुग्ण इस्पितळात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.

दरम्यान, एका टॅक्सीचालकाने दिलेल्या माहितीनुसार, सदर उड्डाण पुलाच्या खाली पोकळ भागाकडे जाणारा मॅनहोल बंद करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जर हे मॅनहोल बंद केले नाहीतर हा पूल अनैतिक व्यवहाराचे केंद्र बनेल, अशी भीतीही त्याने व्यक्त केली.