>> आतापर्यंत एकूण पाच संशयित ताब्यात
काटे बायणा येथील उमेश हरिजन (३३) याच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या आणखी तीन आरोपींना मुरगाव पोलिसांनी कर्नाटकात बागलकोटमध्ये रविवारी जेरबंद केले. जुम्मन शेख (२८), परशुराम दोड्डामणी (२५) आणि दुर्गाप्पा मदार (२८) अशी त्यांची नावे आहेत.
काटे – बायाणा, वास्को येथे ५ सप्टेंबर रोजी झालेल्या ३३ वर्षीय उमेश हरीजन याच्या खूनप्रकरणी फरार असलेल्या तीन संशयितांना रविवारी संध्याकाळी मुरगाव पोलिसांनी गोव्याबाहेरून गजाआड केले. उमेश हरीजन याचा पाच हत्यारांनी सपासप वार करून खून केला होता. घटनेनंतर पसार झालेल्यांपैकी अमीर हुसैन व दीपक सहानी या दोन संशयितांना फोंडा पोलिसांनी पाठलाग करून बाणस्तारी मार्गावरून गजाआड केले होते. तर जुम्मन, परशुराम ऊर्फ परश्या आणि दुर्गाप्पा हे तिघे पसार झाले होते. त्यांना मुरगाव पोलिसांनी कर्नाटकातून गजाआड केले. गेल्या सात दिवसांपासून मुरगाव पोलीस त्यांच्या मागावर होते.
रविवारी पहाटे कारवाई
दरम्यान, संशयित राज्याबाहेर कर्नाटकात बागलकोट एका ठिकाणी असल्याचे कळताच रविवारी पहाटे पथकाने तेथे जाऊन तिघांना ताब्यात घेतले. यावेळी तिघेही आरोपी बेळगावला जाण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांनी दिली.