राज्यात ९१ इंच पाऊस

0
17

>> सांगे तालुक्यात १०० इंच पाऊस

राज्यात मोसमी पावसाने इंचाची नव्वदी पार केली असून, आत्तापर्यंत ९१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत सरासरी ८.३ टक्के एवढी पावसाची तूट नोंद झाली आहे. वाळपई, पेडणे, केपेनंतर आता सांगे येथे मोसमी पावसाने इंचाचे शतक पूर्ण केले आहे. सांगे येथे आत्तापर्यंत १००.७५ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात मागील एक महिना पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या सतरा दिवसांत जोरदार पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. ऑगस्ट महिन्यात सुध्दा पावसाचे प्रमाण कमीच आहे. केवळ तीन दिवस सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील वाळपई, पेडणे, केपे आणि सांगे येथे पावसाने इंचाचे शतक पार केले आहे. काणकोण, फोंडा, साखळी, म्हापसा, जुने गोवा येथे चांगल्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव येथे सर्वांत कमी ६४.१२ इंच पावसाची नोंद झाली आहे. दाबोळी येथे ७२.६८ इंच, मडगाव येथे ७७.६४ इंच, पणजी येथे ७८.२६ इंच, म्हापसा येथे ८२.६४ इंच, साखळी येथे ८५.४२ इंच पावसाची नोंद झाली आहे.