>> निवडणूक निकालाविषयी उमेदवारांसह मतदारांत उत्सुकता; मतमोजणीची तयारी पूर्ण; तालुका पातळीवर होणार मतमोजणी
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी बुधवारी मतदान पार पडल्यानंतर सर्वांना मतमोजणीची उत्सुकता लागून राहिली असून, शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून तालुका पातळीवर मतमोजणीनंतर निकाल होणार आहे. ग्रामीण भागातील मतदार गावाच्या कारभाराची सूत्रे कोणाकडे सोपवतात, हे शुक्रवारी स्पष्ट होणार असल्याने उमेदवारांसह मतदारांमध्ये देखील निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. राज्यभरात तालुका पातळीवर मतमोजणी केली जाणार असून, सरकारी यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७८.७० टक्के मतदानाची नोंद झाली होती. वर्ष २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तुलनेत वर्ष २०२२ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत कमी मतदान झाले आहे. २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.३३ टक्के मतदान झाले होते.
राज्यातील १८६ ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे ७ लाख ९६ हजार ०७० मतदारांपैकी ६ लाख २६ हजार ४९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावणार्यांमध्ये महिलांची संख्या जास्त होती. ३ लाख २६ हजार ७८८ महिला मतदारांनी मतदान केले, तर केवळ २ लाख ९९ हजार ७०७ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उतरले आहेत. प्रमुख राजकीय नेत्यांच्या नेत्यांचे समर्थन त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना लाभले आहे. पंचायत निवडणुकीत प्रस्थापितांबरोबर नवोदित उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गाव पातळीवर पंचायत निवडणूक निकालाबाबत जोरदार चर्चा सुरू असून, कोण निवडून येणार, याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहे. पंचायत निवडणुकांत भाजपचे समर्थक मोठ्या संख्येने निवडून येतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.
कळंगुट पंचायतीच्या प्रभाग ९ साठी ७९.४७ टक्के मतदान
कळंगुट ग्रामपंचायतीच्या प्रभाग ९ मध्ये काल ७९.४७ टक्के मतदानाची नोंद झाली. १० ऑगस्ट रोजीच्या निवडणूक मतदानाच्या वेळी कळंगुट ग्रामपंचायतीमधील प्रभाग ९ मधील मतपत्रिकेत काही उमेदवारांची नावे आणि चिन्ह यांच्या छपाईत चूक आढळून आल्याने निवडणूक मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. या प्रभागात मतदान घेण्यासाठी नव्याने प्रक्रिया पूर्ण करून मतदान घेण्यात आले, अशी माहिती निवडणूक अधिकार्यांनी दिली.
तालुका पातळीवर कुठे होणार मतमोजणी?
तालुका ठिकाण
तिसवाडी : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी
सत्तरी : कदंब बसस्थानक सभागृह वाळपई
बार्देश : दयानंद बांदोडकर क्रीडा संकुल पेडे-म्हापसा
पेडणे : संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय विर्नोडा आणि दीनदयाळ भवन तुये-पेडणे
डिचोली : नारायण झांट्ये महाविद्यालय बहुउद्देशीय क्रीडा संकुल सर्वण-डिचोली
सासष्टी : माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुल मडगाव आणि मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम नावेली
फोंडा : आयटीआय फर्मागुडी
सांगे : सरकारी क्रीडा संकुल सांगे
धारबांदोडा : सरकारी प्रशासकीय इमारत संकुल धारबांदोडा
काणकोण : मामलेदार कार्यालय परिषद सभागृह काणकोण
केपे : सरकारी क्रीडा संकुल बोरीमळ-केपे,
मुरगाव : रवींद्र भवन मिनी थिएटर बाय