>> १४६४ प्रभागांतून तब्बल ५०३८ उमेदवार रिंगणात; मतदान साहित्य नेण्यासाठी कर्मचार्यांची लगबग; मतदारांत उत्साह
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका आज (बुधवारी) होत असून,
सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. काल सकाळपासूनच उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयांतून या निवडणुकांसाठीचे मतदान साहित्य पंचायत क्षेत्रातील मतदान केंद्रांवर पाठवण्याचे काम सुरू झाले होते. ग्रामीण लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदार देखील उत्सुक आहेत. १८६ ग्रामपंचायतींच्या १४६४ प्रभागांत ५०३८ उमेदवार रिंगणात असून, ६४ जणांची यापूर्वीच पंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
भागांसाठी हे मतदान होणार असून, एकूण मतदारांचा आकडा हा ७ लाख ९७ हजार ०२० एवढा आहे. त्यापैकी ३ लाख ८७ हजार ००१ हे पुरुष मतदार, तर ४ लाख १० हजार ०१८ महिला मतदार आहेत. तसेच मतदारांमध्ये एका तृतीयपंथीयांचाही समावेश आहे. १५१७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी ४५ केंद्रे ही संवेदनशील केंद्रे आहेत.
मतदान आणि निवडणूकविषयक साहित्य नेण्यासाठी काल सकाळपासून सरकारी कर्मचार्यांनी प्रत्येक तालुक्यातील निहित केंद्रांवर गर्दी केली होती. दिवसभर कर्मचार्यांना मतदान साहित्य देण्याचे काम सुरू होते. त्यानंतर हळूहळू कर्मचारी सदर साहित्य घेत दिवसअखेरपर्यंत मतदान केंद्रांवर दाखल झाले.
ज्या मतदारांना कोविडचा संसर्ग झालेला आहे, त्यांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने सायंकाळी ४ ते ५ हा मतदानाचा शेवटचा तास त्यांच्यासाठी राखून ठेवला आहे. हे कोविड रुग्ण ह्या शेवटच्या तासाला येऊन मतदान करू शकतील, असे आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
आज निवडणुकीला सामोरे जाणार्या उत्तर गोव्यातील पंचायतींपैकी १७ पंचायती ह्या पेडणे तालुक्यातील आहेत. सत्तरी तालुक्यातील १२, डिचोली तालुक्यातील १७, बार्देश तालुक्यातील ३३, तिसवाडीतील १८ पंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यातील १९ पंचायती, सासष्टी तालुक्यातील ३३, सांगे तालुक्यातील ७, धारबांदोडा तालुक्यातील ५, काणकोण तालुक्यातील ७, केपे तालुक्यातील ११, तर मुरगाव तालुक्यातील ७ पंचायतींचा समावेश आहे.
पेडणे तालुक्यातील १७ पंचायतींतून ४५० जण निवणूक लढवत असून, त्यापैकी ४ जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे. सत्तरीतून २५९ जण निवडणूक लढवत असून, त्यापैकी ११ जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे. डिचोलीतून ३८० जण निवडणूक लढवीत असून, त्यापैकी ९ जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे. बार्देशमधून ९९५ जण निवडणूक लढवत असून, त्यापैकी १३ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. तिसवाडीतून ५८३ जण रिंगणात असून, त्यापैकी ४ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. उत्तर गोव्यातील पंचायतींतून एकूण २६६७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यापैकी ४१ जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
दक्षिण गोव्यातील पंचायतींतून २३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फोंडा तालुक्यातील पंचायतींतून ६०१ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. सासष्टी तालुक्यातील विविध पंचायतींतून ८६३ जण निवडणूक लढवत असून, त्यापैकी ११ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. सांगे तालुक्यातील पंचायतींतून १५६ जण निवडणूक लढवीत असून, त्यापैकी २ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. धारबांदोडा तालुक्यातील पंचायतींतून १२३ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. काणकोणातील पंचायतींतून १६९ उमेदवार निवडणूक लढवत असून, त्यापैकी ३ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. केपेतून २४० जण निवडणूक लढवत असून, त्यापैकी ४ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. मुरगाव तालुक्यातील विविध पंचायतींतून २१९ जण निवडणूक लढवत असून, त्यापैकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड झालेली आहे.