नितीश कुमारांचा काल राजीनामा; आज पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ

0
12

>> भाजपसोबत युती तोडल्यानंतर जदयूचे राजदसोबत नवे सत्तासमीकरण

बिहारमध्ये जनता दल युनायटेड (जदयू) आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) या महागठबंधन सरकारचा बुधवार दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता शपथविधी होणार आहे. नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, तर राजदचे नेते तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

मंगळवारी भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्तास्थापनेचा दावा केला. नितीश कुमार यांनी राज्यपालांना १६४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिले आहे. या सरकारला कॉंग्रेसचाही पाठिंबा मिळाला असून, त्यांना ४ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
बिहारच्या राजकारणात काल मोठा राजकीय भूकंप झाला.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बिहारमधील भाजप आणि जनता दल (युनायटेड) यांच्यातील युती संपुष्टात आली. सोबतच नितीश कुमार यांच्या जेडीयूने एनडीएसोबतची युती तोडल्याचे जाहीर केले. येनकेन प्रकारे बहुतांश राज्यात सत्ता बळकावणार्‍या भाजपला बिहारमध्ये मात्र नितीश कुमारांच्या निर्णयाने जोरदार धक्का बसला आहे.

मागील काही दिवसांपासून भाजप आणि जदयू यांच्यातील युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तीव्र राजकीय अटकळींनंतर काल अखेर युती तोडल्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली. नितीश कुमार यांनी काल आपल्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर ही घोषणा केली. युती तोडल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे सोपवला.

भाजपसह नरेंद्र मोदींना धक्का
एनडीएसोबत काडीमोड घेत नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का दिल्याची चर्चा आहे. नुकत्याच पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित होते. मागील एका महिन्यात मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला नितीश कुमार दुसर्‍यांदा गैरहजर राहिले होते. त्यामुळे नितीश कुमार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता.