ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

0
33

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे ते मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय झाले होते.

मराठीत लोकप्रिय ठरलेल्या मोजक्या विनोदी अभिनेत्यांमध्ये प्रदीप पटवर्धन यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गिरगावात राहणार्‍या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. त्यानंतर ते व्यावसायिक नाटकांकडे वळले. १९८५ साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केली होती. या नाटकातील भूमिकेने त्यांना खर्‍या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. मोरूची मावशी या नाटकाचे त्यांनी दोन हजारहून अधिक प्रयोग केले होते. याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘१२३४’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. त्यासोबतच ‘होल्डिंग बॅक’, ‘मेनका उर्वशी’, ‘थँक यू विठ्ठला’, ‘१२३४’ आणि ‘पोलीस लाईन : एक पूर्ण सत्य’ यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.
नव्वदच्या दशकात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर यांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्याबरोबर एकत्रित अनेक मराठी चित्रपटातून काम केले होते. विजय पाटकर यांच्या चित्रपटातूनही प्रदीप पटवर्धन यांनी काम केले होते.