नीरज चोप्रा हे नाव भारतीय क्रीडा जगतासाठी आता नवीन राहिलेले नाही. ऑलिम्पिक गाजवलेला भारताचा ‘डॅनिस लिली’ असेच नीरजला म्हणावे लागेल. याच ‘डॅनिस लिली’ने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वयाच्या केवळ २४व्या वर्षी रौप्यपदक पटकावत इतिहासाला गवसणी घातली. नीरज व लिली या दोघांचेही क्रीडा प्रकार तसे वेगळेच या द्वयीचा परस्पर संबंधदेखील नाही. पण, नीरजला घडवलेले ऑस्ट्रेलियाचे दिवंगत प्रशिक्षक गॅरी केल्वर्ट नीरजची तुलना नेहमीच लिली यांच्याशी करायचे. श्रीलंका, पाकिस्तान यांनी क्रिकेटमध्ये अनेक वेगवान गोलंदाज घडवले. भारतात मात्र ही जात तशी विरळीच. लिली यांचा वेग भल्याभल्यांना भंडावून सोडणारा होता. चेंडू टाकताना लिली नेहमीच काही सेकंद वेळ घ्यायचे, त्यामुळे चेंडूचा वेग, टप्पा यांचा अंदाज घेणे सोपे व्हायचे. नीरजचेदेखील तसेच आहे. भाला फेकताना नीरज अधिक वेळ घेतो. त्यामुळे त्याला अधिक अंतर कापता येते. केल्वर्ट यांनादेखील अर्थातच लिली आवडायचे. क्रीडा क्षेत्राचा अभ्यास असल्याने त्यांची निरीक्षण शक्तीदेखील वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे त्यांनी ‘भालाफेकीमधील लिली’ असे नामकरण नीरजचे केले होते हे मोजक्यांनाच माहिती आहे.
२०१६ साली झालेल्या अंडर २० जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत केल्वर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली नीरजने सुवर्ण पदकाला गवसणी घालत सर्वांचे लक्ष वेधले होते. वयोगटातील सुवर्णपदक असल्याने या पदकाची फारशी चर्चा त्यावेळी झाली नाही, पण कुमारवयात असलेली प्रचंड शिस्त, शिकण्याची आवड, सर्वोत्तम होण्यासाठी सर्वस्व झोकण्याची तयारी असलेला नीरज त्यांनी हेरला होता. भारतात जन्मलेले दुर्मीळ टॅलेंट असाच नीरज होता आणि आहेदेखील. यापूर्वी भारताच्या ऍथलेटिक क्षेत्रात मिल्खा सिंग, अंजू बॉबी जॉर्ज या माजी खेळाडूंना प्रचंड वलय प्राप्त झाले होते. पण, नीरजने अल्पावधीत मिळविलेले यश या जुन्या पिढीतील वाट्याला आले नाही.
भारतातून जागतिक स्तरावरील ऍथलिट क्वचितच येतात. ते देखील लांब उडी, धावणे, रिले, गोळाफेक आदी प्रकारातील असतात. त्यातच यातील अनेकजण कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजकांच्या आहारी किंवा वादात सापडतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली जाते किंवा त्यांच्यावर नाईलाजास्त बंदीची कारवाई केली जाते. हळूहळू त्यांचे वलय नाहीसे होते व ते क्रीडाक्षेत्राच्या क्षितिजावरून कधी नाहीसे होतात त्याची आठवणही उरत नाही. नीरजचे तसे नाही. भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची नावे घेण्यास सुरुवात केल्यास यातील पहिले नाव हे नीरजचे असेल. नीरजने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून भारताचे नाव उंचावले. आता त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिकमध्ये त्याने ८७.५८, तर यावेळी ८८.१३ मीटर अंतर कापले. भाला फेकण्याच्या वेळेस मैदानाची स्थिती, वार्याचा वेग, वार्याची दिशा या सर्वांवर अंतर अवलंबून असते. या सर्वांचा अंदाज बांधून खेळाडूला आपल्या धावण्याची गती, खांद्यांची तसेच हातांची हालचाल करावी लागते. हे सर्व करत असताना भाला फेकतेवेळी ‘फाऊल’ होऊ नये यासाठीदेखील समोरील लाईनवर बारकाईने लक्ष द्यावे लागते. या सर्व प्रक्रियेतून जाऊनही अनेकांना नीरजने कापलेल्या अंतराच्या जवळपासही जाता आलेले नाही. केवळ ग्रेनडाच्या खेळाडूलाच ९० मीटरचा जादुई टप्पा पार करणे शक्य झाले. त्यामुळे नीरजने मिळविलेले यश अनन्यसाधारण असेच म्हणावे लागेल.
भारताचा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील तब्बल १९ वर्षांचा दुष्काळ संपवताना नीरजने रुपेरी यश मिळविले. पहिल्या तीन प्रयत्नांत यशाने साथ न दिल्यानंतर त्याने धीर न सोडता चौथ्या प्रयत्नात आपल्या रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत भारताने मिळविलेले हे सर्वोच्च पदक ठरले. २००३ साली अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. यानंतर एकाही भारतीयाला या कामगिरीच्या जवळपासही जाते आले नव्हते. आता काही दिवसांत राष्ट्रकुल स्पर्धा येऊन ठेपली आहे. भारताला त्याच्याकडून या स्पर्धेत खूप अपेक्षा आहेत. रौप्य पदकानंतर हुरळून न जाता नीरजचे लक्ष्य आता राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे आहे. नीरजने तसा विश्वासही व्यक्त केला आहे. सातत्य कायम राखून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रुपेरी पदकाचे रुपांतर नीरज सोनेरी पदकात करेल, अशी अपेक्षा बाळगून त्याला सुयश चिंतुया.