राष्ट्रपतिपदी निवड झाल्याने द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन

0
19

देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल द्रौपदी मुर्मू यांचे काल राज्य विधानसभेत अभिनंदन करण्यात आले. यावेळी अभिनंदन ठरावावर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे अंत्योदय तत्त्वावर काम करणारे सरकार असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. द्रौपदी मुर्मू यांची विक्रमी मतांनी राष्ट्रपतीपदी निवड झाली असल्याचे ते म्हणाले. देशाला त्यांचे चांगले मार्गदर्शन लाभणार असल्याचेही पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी, द्रौपदी मुर्मू यांचे जीवन हे आदर्शवत व प्रेरणादायी असे आहे. त्यांच्या जीवनावर कित्येक संकटे आली. मात्र, त्या सर्व संकटांवर मात करून त्या खंबीरपणे उभ्या राहिल्याचे नमूद केले.

माविन गुदिन्हो यांनी, द्रौपदी मुर्मू यांचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा. त्यांनी कित्येक संकटांवर मात केल्याचे सांगितले. राज्यपालपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्या पुन्हा आपल्या शिक्षकी पेशाकडे वळल्या व वेतन न घेता त्यांनी विद्यादानाचे काम केल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

यावेळी विविध मंत्री व नेत्यांनी अभिनंदन ठरावावर बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.