- – मीना समुद्र
थोरांच्या एका शब्दासाठी प्राण पणाला लावणारी माणसेही होऊन गेली; पण वंचना झालेल्या स्त्रीचा किंवा वारंवार फसवल्या गेलेल्या, अमानुष वागणुकीला बळी पडलेल्या एखाद्या गरीब पण स्वाभिमानी माणसाला अनुभवातून आलेलं हे शहाणपण असावं असं वाटतं.
परवा काही जुनी कागदपत्रे पाहत असताना श्रीमती शांता शेळके यांची एक छापील कविता हाती आली. त्यांच्या ‘अनोळख’ संग्रहातली ‘हा खेळ जीवघेणा’ ही ती कविता होती. शांता शेळके यांचं ललित, गद्य, पद्य, गीतं केव्हाही वाचावीत अशीच. त्यामुळे बाकी सगळं बाजूला सारून ती कविता वाचायला सुरुवात केली-
ते बोलू देत नाही मी बोलणार नाही
शब्दात भाव माझा मी तोलणार नाही
शेरोशायरीच्या वळणाने जाणारी ही कविता त्यांच्या इतर गीतकाव्यांपेक्षा किंवा मुक्तछंदात्मक कवितेपेक्षा वेगळी वाटली. आणि एकदम कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पहिल्या दोन ओळी तर अगदी समसमान वाटल्या. कुसुमाग्रजांच्या त्या ओळी अशा-
काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही
कुसुमाग्रजांच्या या कवितेचे गीत झाले आहे. बोलणे शक्य आहे, पण इष्ट नाही ही उमज यातून दिसते. या दोन महान कवींची मानसिकता किती एकच प्रकारची दिसते. त्यांच्यातले भौगोलिक अंतर भलेही दोन ध्रुवांइतके असो; तरी ते अगदी सहजपणे पार होताना दिसते. ती काल्पनिक रेषा पुसून जाते. समानधर्मी कवींच्या कवितेतले भाव थोडेफार वेगळे असतीलही, पण शब्द आणि रचना यात नक्कीच साधर्म्य आहे.
शांताबाईंच्या कवितेतल्या ओळीत विजयाने धुंद झालेल्या माणसाभोवती स्तुतिपाठकांची गर्दी जमते आणि त्याचा सार्वत्रिक उदो उदो-होऊ लागतो. पण त्या विजयाने, त्या पराक्रमाने, त्या यशाने जे अभिमानाचे, कृतार्थतेचे आणि त्याहीपेक्षा जास्त कौतुकाचे भाव गोळा झाले आहेत ते वरवरच्या शब्दांत व्यक्त करणे म्हणजे अनमोल मोती मातीमोल करणे. मनातला हा भाव आदराचा, प्रेमाचा आहे; तो व्यर्थ उघड करणार नाही. मनात खूप काही सांगायचे आहे तरी प्रदर्शन करण्याची वृत्ती नाही. तो भाव डोळ्यांतून, स्पर्शातून वा एखाद्या छोट्या कृतीतूनही व्यक्त होऊ शकतो. किंवा इतरांच्या शब्दातून मत्सराने, द्वेष भावनेने, विरोधी वृत्तीने काही शब्द बाहेर पडले तरीही फुकाचे शब्द बोलणार नाही. शब्दाला शब्द वाढवून शब्दाची किंमत, त्याचा मान, त्याची मर्यादा, त्याचे मूल्य कमी करणार नाही. काळजाचे बोल वार्यावर उधळण्यासाठी नसतात.
गर्दी तुझ्या सभोती
लाचार दांभिकांची
लाटेवरी अशा मी हिंदोळणार नाही
गर्दीची मानसिकता वेगळीच असते. हे सारे लोक तोंडपुजे आहेत, दांभिक आहेत. त्यांच्या ओठावर मध आणि हृदयात विष आहे. स्वार्थासाठी जमा झालेले हे लोक आहेत. दुसर्याच्या स्थितीचा स्वतःला आयता लाभ करून घेणे मला जमणार नाही. ही गर्दी म्हणजे उचंबळून वर उठणारी लाट आहे; त्यावर मी हिंदोळणार नाही, आंदोळणार नाही. कारण ही लाट रोरावत, फेसाळत येणार नि उंचावेलही; पण ती पुन्हा परतणार, विरणार हे मला चांगले ठाऊक आहे. उदय आणि अस्त, विकास आणि अधोगती हे चक्रनेमिक्रमेण चालू असते. ते क्षणिक असते याची कल्पना मला आहे. खर्या प्रेमात विश्वासाचा ठामपणा असतो. श्रद्धा, निष्ठा ही खडकाप्रमाणे अविचल असते. त्यामुळे या दांभिकपणात सहभागी होऊन मी दांभिक, स्वार्थी बनणार नाही. मला लाचार व्हायचे नाही.
हा कागदी फुलोरा
स्तुतिपाठ बेगडाचे
अंतःस्थ गूज येथे
मी खोलणार नाही
हे शब्द अस्सल नाहीत. हा कागदी फुलोरा आहे. कागदासारख्या निर्जीव, चैतन्यहीन भावना आहेत. खर्या फुलांची मृदुता, सुगंध, नजाकत यांच्यात नाही. कारण हे शब्द वरवरचे, तात्पुरते, दिखाव्यासाठी आलेले आहेत. अंतःकरणातलं गुपित, माझं प्रेम, माझी माया मी अशी वार्यावर उधळणार नाही. काळजानं काळजाशी बोलण्याचे शब्द मी असे उघडे करणार नाही. माझ्या मनातल्या सुप्त भावना हा माझा ठेवा आहे. तो असा व्यर्थ उधळणार नाही. ही बेगडी वरवरची स्तुती तुम्हालाच लाखलाभ असो. ज्या दिशेला वारे त्या दिशेला सारे… पण असे दिशा बदलणे, पाठ फिरवणे मला जमणार नाही. मनातलं गुज खुलं करून या गर्दीसमोर त्याचा बाजार मांडणार नाही. भावनांचं पावित्र्य मी जपेन.
तू शब्द बोलशी
तो डुलतात येथ माना
देऊन दाद खोटी
मी डोलणार नाही
गर्दीपुढे तू बोलतोस ः शब्द बापुडे केवळे वारा- असेच ते बोलणे. सर्वजण या बोलण्याला माना डोलावतात. पण ढोंगी भुलथापांना मी फसणार नाही. त्यांना माना हलवून दादही देणार नाही. ‘राजा बोले दल हाले’ अशी म्हण प्रचलित असली तरी मला काही फरक पडत नाही. कारण असे फसवे भुलावणीचे शब्द मी अनेकदा ऐकले आहेत. त्यातला पोकळपणा, दांभिकपणा, उसनी ऐट मला ठाऊक आहे. दाद कशी अंतःकरणापासून उमटायला हवी. टाळ्या वाजवणं, हात उंचावणं, रुमाल फडकावणं, वाहवा ही अशी दाद पापणी लवते इतक्या प्रतिक्षिप्तपणे, इतक्या सहजपणे यायला हवी. हे तुझे बोल असे आहेत ते मला माहीत आहे. माझ्यालेखी त्यांना काडीचीही किंमत नाही.
श्वासासही तुझ्या ये
बहुमोल मोल येथे
ती मौल्यवान थुंकी
मी झेलणार नाही
आज तुझा एकेक श्वास, त्याबरोबर उच्चारलेला शब्द मौल्यवान झाला आहे. एकेक शब्द, एकेक बोल थुंकीसारखा झेलला जातो आहे. तुझ्या तोंडून उमटणारा प्रत्येक शब्द प्रमाण मानला जातो आहे. तू कितीही मोठा असलास तरी तुझ्या उरी कणव नसेल, कुणाबद्दल सहानुभूती नसेल. माणुसकीचं चिन्ह नसेल तर ते शब्द त्याज्य आहेत, खोटे आहेत, गर्वोन्नत आहेत. मी ते मान्य करणार नाही. कारण मला माझे सत्त्व आहे, माझा स्वाभिमान आहे, संस्कार आहेत. ते सत्त्व, तो स्वाभिमान मला जपायचा आहे. तू कितीही मोठा असलास तरी असत्याच्या पायावर तुझा डोलारा उभा असेल. इतरांनी तुझ्याभोवती गोंडा घोळला तरी मी मात्र अशी दीन, लाचार होणार नाही. तुझी ‘री’ ओढणार नाही. तुझी हुजरेगिरी करणार नाही. तुझी चमचेगिरी करणार नाही. तुझी हां जी हां जी करणार नाही.
गर्दीमधे घुसावे
खड्ड्यामध्ये फसावे
हा खेळ जीवघेणा
मी खेळणार नाही
तुझ्याभोवती तुझी आरती ओवाळणार्यांची गर्दी जमली आहे. अशा ढोंगी स्तुतिपाठकांच्या गर्दीत घुसणं म्हणजे सरळ-सरळ गर्तेत जाणं, खड्ड्यात फसणं. वंचनेचा हा जीवघेणा खेळ मी खेळणार नाही. डोळे असून आंधळे असलेले आणि कान असून बहिरे झालेले हे लोक स्वार्थी हेतूने तुला घेरून राहिलेले असताना मी तिथे घुसलो तर त्या छोट्या स्तुतीने माझा जीव गुदमरून जाईल. माझे प्राण ते शब्द ऐकून कंटाशी येतील. तुझ्यासमवेत तुझ्याभोवती जमलेल्या गर्दीचे आंधळेपणाने खड्ड्यात पडणे आणि ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ हे माहीत असूनही मी जर खड्ड्यात उडी मारली तर तो खेळ जीवघेणा ठरेल. सत्य, सत्त्व, स्वाभिमान यांचा अंत म्हणजे मनुष्यजीवनाचाच अंत. असा जीवघेणा खेळ मी खेळणार नाही.
थोरांच्या एका शब्दासाठी प्राण पणाला लावणारी माणसेही होऊन गेली; पण वंचना झालेल्या स्त्रीचा किंवा वारंवार फसवल्या गेलेल्या, अमानुष वागणुकीला बळी पडलेल्या एखाद्या गरीब पण स्वाभिमानी माणसाला अनुभवातून आलेलं हे शहाणपण असावं असं वाटतं.