पूजा करा रे मनोभावे…!

0
42
  • डॉ. सीताकांत घाणेकर
    (योगसाधना- ५५७, अंतरंगयोग- १४२०)

पूजेत मुख्य आहे तो भगवंताविषयी भाव, प्रेम, श्रद्धा. तसेच परस्परांबद्दल आदर, वात्सल्य, सहकार्य अपेक्षित आहे. तसे असले की आपोआप सर्वांचे मन प्रसन्न राहते. प्रत्येकाला सुख व आनंदाचा अनुभव येतो.

विश्‍वात विविध धर्म आहेत. म्हणजे वेगवेगळे मार्ग आहेत. वैदिक सनातन (हिंदुधर्म), ख्रिश्‍चन, इस्लाम, शीख, पारशी… खरा धर्म एकच- मानवता धर्म आणि त्याचे ध्येय आहे- विश्‍वप्रेम, विश्‍वबंधुत्व, विश्‍वशांती… यासाठी आवश्यक आहे- सर्वांमध्ये सुसंवाद!
प्रत्येक धर्मामध्ये विविध सिद्धांत, कर्मकांडे, धर्मग्रंथ, पूजास्थळे, आकृती… आहेत. त्याचबरोबर अनेक धर्मगुरू आहेत. धार्मिक सिद्धांतांमागे जे उच्च तत्त्वज्ञान आहे ते समजण्यासाठी कर्मकांडे आहेत. त्यामध्ये पूजा मुख्य आहे.
पूजा म्हटली की आपल्या डोळ्यांपुढे अनेक गोष्टी येतात- देवाची प्रतिमा, पूजा सामग्री- पाने, पुष्पे, फळे, पाणी, आरती, नैवेद्य… पुरोहित, यजमान, आमंत्रित, महाप्रसाद… अवश्य या सर्व गोष्टी आवश्यक आहेत; पण मुख्य आहे तो म्हणजे भगवंतावर भाव, प्रेम, श्रद्धा. तसेच परस्परांबद्दल आदर, वात्सल्य, सहकार्य अपेक्षित आहे. तसे असले की आपोआप सर्वांचे मन प्रसन्न राहते. प्रत्येकाला सुख व आनंदाचा अनुभव येतो.

आपण पत्र, पुष्प… या विषयांचे सविस्तर ज्ञान आत्मसात केले. आता फळाबद्दल बघू. फळे विविध आहेत- केळी, चिकू, आंबा, कलिंगड, काजू, द्राक्षे, जांभळे, मोसंबी, संत्री, बोरे- यांतील विविध फळे आपण पूजेसाठी ठेवतो. बाजारातून फळवाल्याकडून विकत आणताना आपण त्याला सांगतो- ‘‘अहो, चांगली फळे द्या. देवपूजेसाठी आहेत!’’ भाव चांगला आहे. तद्नंतर आपणदेखील ती फळे तपासून बघतो व ती चांगली फळे देवासमोर ठेवतो.
यांतील काही फळे आंबट असतात- बोरे, संत्री, मोसंबी, आंबा… पण ती आपण चाखून बघत नाही. फक्त रामभक्त शबरीने म्हणे भगवंताला बोरे देताना चाखून बघून गोडच फळे त्यांना अर्पण केली. शबरीसारख्या श्रेष्ठ भक्तिणीचा भावच वेगळा. त्याशिवाय म्हणे ती अस्पृश्य होती. तत्त्वज्ञानाचा शास्त्रशुद्ध अभ्यास न केल्यामुळे असे विविध गैरसमज पसरले आहेत. ज्या शरीरामध्ये भगवंत वास करतो ते शरीर अस्पृश्य कसे असेल? स्वतः श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात-
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो

  • मी सर्वांच्या हृदयात वास करतो.
    प्रभू रामचंद्रांनी तर शबरीने दिलेली बोरे खाऊन वर्णांबद्दल गैरसमज दूर केले.
    इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आपण प्रभूला अर्पण करतो ते म्हणजे कर्मफळ. फळ हे फक्त एक प्रतीक आहे. यामागील भाव बघायला हवा.
    ज्याच्या शक्तीने आपली सर्व कर्मे सहज घडतात तोच भगवंत- फळाचा खरा अधिकारी आहे. म्हणून आपण म्हणतो-
    इदं फलं मया देव स्थापितं पुर-तस्तव
    संस्कृत भाषा न समजल्यामुळे हा गर्भितार्थ आम्हाला माहीत नाही. अर्थ समजला तर भावार्थही वाढेल.
    इथे आणखी एक मुद्दा नोंद करायला हवा. आपल्या कर्माचे फळ भगवंत खात नाही.
    भूतभावोद्भवकरः विसर्गः कर्मसंज्ञितः
    भूतांचा भाव आणि उद्भव करण्यासाठी तू जे काही केले असेल तेच खरे कर्म गणले जाते आणि त्याचेच फळ भगवान स्वीकारतो.

इथे प्रत्येकाला जाणीव व्हायला हवी की आपले प्रत्येक कर्म सत्कर्म हवे, जे आपण भगवंताला अर्पण करू शकतो. दुष्कर्म नाही. चांगली वेचून काढलेली फळे तर हाच सिद्धांत दाखवतात.
दुसर्‍या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात-
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ (गीता २-४७)

  • तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी आशा धरू नकोस. म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.
    कर्मफळाबद्दल आसक्ती ठेवली नाही तर व्यक्तीचे संपूर्ण ध्यान कर्मावरच राहील व त्याची कर्तृत्वशक्ती वाढेल. म्हणून शास्त्रकारांनी हा सिद्धांत मांडला. तसेच श्रीकृष्ण म्हणतात की, कर्म न करण्याचा आग्रह नको.

याबद्दल तत्त्ववेत्त्यांनी असेही सांगितले की- ‘जैसे पेराल तैसे उगवेल!’ म्हणून आग्रह धरला तर तो सत्कर्माचाच ठेवावा. लहानपणी ऐकले होते, ‘करावे तसे भरावे!’ चांगली कर्मे केली तर क्रियमाण-संचित-प्रारब्ध तीनही कर्मे व्यवस्थित होऊन मानव सुखशांतीने राहू शकेल.
आपण भगवंताला पाच तर्‍हेची फळे अर्पण करतो. प्रत्येक फळाचे गुण वेगळे असतात- आकार, गंध, स्वाद, रंग, गोडवा. तसेच कर्मदेखील विविध असते. कदाचित असे करण्यामागे हाच भावार्थ-गर्भितार्थ असेल.
फळ भगवंताला अर्पण केले की तो प्रसाद बनतो. त्या प्रसादाबद्दल भाव वेगळा असतो. प्रसाद आपण एका हाताने स्वीकारतो, पण दुसरा हात त्याच्या खाली ठेवतो. स्वीकारण्यासाठी उजवा हात वापरतो. ही प्रथा आहे. त्यामागे आदरभाव आहे. कुठलाही प्रसाद असूद्या… फळाचा छोटासा तुकडा, चिमूटभर शिरा किंवा साखरभात, चमचाभर खिर… तो घेणारा प्रेमाने स्वीकारतो. भगवंताच्या चरणावर अर्पण केलेल्या फळाला एक अतिरिक्त स्थान आहे.

थोडे चिंतन केले तर लक्षात येईल की भगवंताने समर्पणाचा एक योग्य व अत्युच्च मार्ग दर्शविला आहे. या छोट्याशा प्रथेमागे सृष्टिकर्त्याबद्दल कृतज्ञता आहे.

त्यानंतर पूजेच्या सामग्रीमध्ये येते ते ‘तोयं’- म्हणजे पाणी. तो तर जीवनरसच आहे. मानवाच्या जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत- बालपण, तरुणपण, वृद्धत्व. या तीनही अवस्थांमध्ये व्यक्तीची ताकद, जीवनाबद्दल रस वेगवेगळा असतो. सुरुवातीला प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा असते की पूर्ण शक्तीनिशी जीवन जगावे; आणि तसे प्रत्येकजण करतोदेखील. पण वृद्धत्व जवळ आले की कामाचा उत्साह कमी होतो. शक्तीदेखील घटते. मात्र जोपर्यंत मनबुद्धीत तरतरी असते व जीवन जगण्यासारखे वाटते तोपर्यंत प्रभुकार्यात समर्पित केले तर त्या कर्माला वेगळा सुगंध येईल. या विषयावर चिंतन न केल्यामुळे एक गैरसमज असतो की प्रभुकार्य म्हातारपणात करायचे असते.
या मुद्यावर प. पू. पांडुरंगशास्त्री उसाचे छान उदाहरण देतात. ते म्हणतात-
उसाचा रस काढणारा ऊस एकदा मशीनमधून काढतो, दोनदा काढतो, तीनदा काढतो आणि चिपाट झाल्यावर आपल्याला म्हणतो- ‘आता हा तुम्ही चोखा.’ तर त्याला काय आपला सत्कार केला असे म्हणायचे? तसे चिपाट झाल्यावर जीवन भगवंताच्या हातात देऊन म्हटले- ‘भगवान! आता हे जीवन तुझ्यासाठी आहे’ तर त्याला कसला रस असणार? म्हणून जीवन रसमय आहे तोपर्यंत ते समर्पित केले पाहिजे. तीच खरी पूजा आहे, भक्ती आहे.
अर्थात, खरा भक्त जीवनाच्या कुठल्याही वयात, अवस्थेत तेवढाच भावपूर्ण बनून समर्पित असतो. आणि अशावेळी पत्र, पुष्प, फळ किंवा जल ईश्‍वराला भक्तिपूर्वक अर्पण करतो. त्या शुद्ध चित्ताने अर्पण केलेले सर्वकाही ईश्‍वर आनंदाने सेवन करतो.
सारांश- पूजा फक्त कर्मकांड म्हणून न करता भावार्थ व गर्भितार्थ समजून प्रेमाने केली तर नक्कीच आनंद मिळेल. पूजेचे फळ मिळेल- प्रसादरूपाने.
(संदर्भ ः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- संस्कृती पूजन- पूजा सामग्री)