पावसाळ्यातील जंतुसंसर्ग

0
103
  • डॉ. मनाली महेश पवार
    (सांतइनेज, पणजी)

पावसाळा म्हटला की येताना अनेक जंतुसंसर्ग रोग (व्हायरल इन्फेक्शन) घेऊन येतो. मग त्याची पूर्वलक्षणे काय व त्यावर आपण घरच्या घरी काय काळजी घेऊ शकतो- जेणेकरून हे व्हायरल इन्फेक्शन आजारात रूपांतरित होणार नाही, याबद्दल थोडे जाणून घेऊ ः

पूर्वी पावसाळा सुरू होण्याअगोदर आपले पूर्वज काही गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवायचे. याचे कारण म्हणजे, पूर्वी दळणवळणाची फारशी साधने नव्हती. बाजारहाटही नेहमी भरत नसे. तसेच पावसाळ्यात शेतीची कामेही सुरू व्हायची. त्यामुळे आहारीय द्रव्यांचा साठा हा अगदी एप्रिल-मे महिन्यातच करून ठेवला जायचा. अगदी चांगली साताठ कडक उन्हे देऊन आहारीय द्रव्ये साठवली जायची. अगदी कडधान्य-धनधान्यांपासून भाज्या, मासे, मटणदेखील चांगले खारवून-सुकवून, कीड लागू नये म्हणून दमट हवेपासून वाचवून साठवून ठेवायचे. आज ती स्थिती नाही. आजकाल सगळं कधीही, केव्हाही, कोणत्याही ऋतूत मिळते. तरीसुद्धा काहीजणी पूर्वीच्या प्रथेप्रमाणे साठवणीचे पदार्थ करतात.
पावसाळा म्हटला की येताना अनेक जंतुसंसर्ग रोग (व्हायरल इन्फेक्शन) घेऊन येतो. मग त्याची पूर्वलक्षणे काय व त्यावर आपण घरच्या घरी काय काळजी घेऊ शकतो- जेणेकरून हे व्हायरल इन्फेक्शन आजारात रूपांतरित होणार नाही, याबद्दल थोडे जाणून घेऊ ः
दोन वर्षांपासून या कोरोना महामारीच्या भीतीने आपण सगळेच हादरून गेलो आहोत. त्यामुळे साधी शिंक जरी आली तरी मनामध्ये पाल चुकचुकते व कोरोना व्हायरस डोळ्यांसमोर दिसतो. वाढते कोविड रुग्ण, चौथ्या लाटेची भीती याचा एकत्र परिणाम मनावर होत आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची पूर्वरूपे जाणणे खूप महत्त्वाचे आहे.

कोरोना का व्हायरल?
पूर्वी पावसाळ्यात सर्दी-पडसे हे फार साधारण होते. पाऊस म्हटला की सर्दी-खोकला होणार हे एवढे साधे होते. कुणीही ही गोष्ट गंभीर घेत नसे. आज कुणी शिंकताना ऐकू जरी आले तरी थोडी मनात शंका येते. तेव्हा मुलंही अगदी सर्दी-ताप असला तरी शाळेत जायची. त्यांना शाळा चुकलेली आवडत नसे. पण आज सक्तीने घरी थांबावे लागते. घरात एखाद्याच्या जरी नाकात हुळहुळायला लागलं किंवा घसा खवखवायला लागला तर पूर्वी एखादा काढाबिडा घेतला जायचा. आज मात्र लगेच डॉक्टर गाठतात.
मग कसं समजायचं व्हायरल का कोरोना? अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास व्हायरल असल्यास नाक गळणार, शिंका येणार, घसा खवखवणार व दोनतीन दिवसांत बरं वाटणार. लक्षणांची गाडी इथेच थांबते. पण जर पाच-सहा दिवस सुका खोकला येत आहे. १०३-१०४ डिग्री असा पहिले दोन दिवस ताप आला. अंगदुखी, घसा खवखवणे चालूच आहे असे जेव्हा रुग्ण सांगतो तेव्हा कोविडचा विचार करावा. तोंडाची चव जाणे, वास न येणे या लक्षणांवर पूर्ण अवलंबून राहू नका. आता सध्या कोरोनाच्या भीतीने बर्‍याच जणांची तशी मानसिकताही तयार झालेली आहे. त्यामुळे अंगदुखीबरोबर सुका खोकला ही पूर्वलक्षणे मानून डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

पावसाळ्यामध्ये श्‍वसनमार्गाचे त्रास होतात हे आपण सर्वच जाणतो. मग हे कोणते आजार, त्यांची लक्षणे काय?

  • सर्दी, खोकला, घशात खवखव, पडसं, डोकेदुखी, शिंका येणे, दम लागणे इत्यादी.
  • त्याबरोबर पचनसंस्थेचे आजार होतात. त्यात अपचन, अतिसार, उलट्या, भूक न लागणे, आंबट ढेकर येणे इत्यादी. त्याचबरोबर संधीचे दुखणेही चाळवते.
  • सर्दी-पडसं असल्यास घरच्या घरी काय काळजी घ्यावी?
  • पावसाळ्यात सर्दी-खोकला झाला म्हणजे सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी. हे कफ दोषाचे विकार असल्याने थंड खाणे, पचायला जड असा आहार घेणे किंवा आंबट खाणे टाळावे. उन्हाळ्यात अनेक प्रकारची सरबते, आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंग्सची सवय झालेली असते. हेच पदार्थ पुढेही पावसाळ्यात तसेच खायला बघतात. हे सर्व पदार्थ टाळावेत. पचायला हलका असा आहार घ्यावा. आलं घातलेला चहा घ्यावा. लालचिनी, लवंग, मिरी, वेलची, तुलसीपत्र घालून चहा घेतल्यासही साध्या सर्दी-पडशामध्ये फायदा होतो.
  • कोरड्या खोकल्यामध्ये काय करावे?
  • ज्येष्ठमधाची काडी तोंडात घालून चघळायची किंवा ज्येष्ठमधाची पावडर दर दोन तासांनी जिभेवर ठेवून (साधारण चिमूटभर) चघळायची म्हणजे कफ सुटायला मदत होते.
  • खडीसाखर किंवा गुळाचा खडा तोंडात ठेवून चघळत राहावे. त्यानेही फायदा होतो.
  • नाक जास्त गळत असल्यास काय करावे?
  • हवामानात बदल झाला म्हणजे त्याचा पहिला परिणाम नाकावर दिसतो. नाकामध्ये हुळहुळायला लागते. ऍलर्जी होते. नाकावाटे आत शिरलेले पदार्थ शरीर त्याचा प्रतिकार म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते व त्यामुळे स्राव निर्माण होतो. शिंका येतात. हा स्राव जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा त्यावर उपाय करायची गरज भासते. त्यासाठी ४-५ तुळशीची पाने पाण्यात टाकून दिवसातून दोन-तीन वेळा वाफ घेणे हा उत्तम पर्याय आहे. हळद टाकून गरम दूध पिणे, घरगुती उपायामध्ये जास्तीचे स्राव कमी करण्यासाठी मिरे, दालचिनी, लवंग, सुंठ, पिंपळी अशा पदार्थांचा वापर करून साधारण तीन दिवस सकाळ-संध्याकाळ काढा घ्यावा. त्रास वाढल्यास वैद्याच्या सल्ल्याने वर्धमान पिपळी रसायन या औषधाचे सेवन करू शकता.

व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून काही टीप्स-

  • एखादा व्हायरस आहारावाटे शरीरात गेला तर आपल्या पोटात विविध रसायने आहेत, जी या व्हायरसला मारून टाकतात. पण जेव्हा हा व्हायरस नाकावाटे शरीरात जातो, तेव्हा तिथे पचन करायला काहीच सोय नाही. मग अशावेळी शरीर स्वतःचे स्राव निर्माण करते. त्यामुळे शिंकावाटे किंवा खोकल्यावाटे हा व्हायरस बाहेर टाकण्याचा शरीर प्रयत्न करते. कधी-कधी आपले शरीर आपल्या रक्तातील पांढर्‍या पेशी तिथे पाठवते, जेणेकरून या पेशी त्या व्हायरसपासून आपल्या शरीराचे संरक्षण करू शकतात. मग यासाठी आपली व्याधिप्रतिकारशक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. हे व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने सांगितल्याप्रमाणे दिनचर्या व ऋतुचर्येचे आचरण करणे महत्त्वाचे आहे.
  • इन्फेक्शन होऊ नये म्हणून रोज नस्य करावे. म्हणजे या विषाणूंचे हल्ले परतवून लावण्यासाठी आयुर्वेदशास्त्राप्रमाणे रोज नस्य करावे. पावसाळ्यात आकाश अभ्राच्छादित नसेल अशा वेळी नस्यविधी करावा किंवा सकाळी उठल्यावर तेलात बोट बुडवून नाकपुडीत फिरवलं तरीही फायदा होतो. रोज दोन-दोन थेंब तीळ तेल, अणु तेल किंवा षड्‌बिंदूतेल नाकात घालावे.
  • गण्डुष ः औषधी द्रव्यांचे काढे किंवा स्नेह तोंडात धरून ठेवणे याला ‘गण्डूष’ म्हणतात.
  • सकाळी उठल्यावर रोज गुळण्या कराव्यात.
  • दिवसातून दोन-तीन वेळा गरम पाण्याची वाफ घ्यावी.
  • पिण्यासाठी व स्नानासाठी गरम पाणीच वापरावे.
  • आहार हा पचण्यास हलका असा हवा. उन्हाळ्यात जसे आपण खिरी खातो त्याप्रमाणे आता खिरीऐवजी सूप सेवन करावे.
  • एका वर्षापेक्षा जास्त जुन्या असलेल्या धान्यांचा वापर करावा.
  • पावसाळ्यात दूधभात, मुगाचे वरण, हुलग्याचे पिठले, भाकरी, चपाती असे सहज पदार्थ आहारात असावेत.
  • दही पूर्ण वर्ज्य करावे. त्याऐवजी ताक प्यावे.
  • जेवणामध्ये सर्व तर्‍हेची पक्वान्ने टाळावीत.
  • स्वयंपाकामध्ये हिंग, सुंठ, मिरे, जिरे, पिंपळी, आले, लिंबू, पुदिना, कोथिंबीर, लसूण यांसारखी दीपन-पाचन करणारी द्रव्ये अधिक प्रमाणात वापरावीत.
  • सर्वच मसाल्याचे पदार्थ अग्निवर्धन करणारे व रूची वाढविणारे असल्याने या पदार्थांचा अधिक प्रमाणात वापर करावा.
  • विशेषतः लसणीचा उपयोग या ऋतूमध्ये अधिकाधिक प्रमाणात करावा.
  • दुधी भोपळा, दोडका, पडवळ, भेंडी यांसारख्या फळभाज्यांचा उपयोग अधिक प्रमाणात करावा. या भाज्यांपासून त्यात योग्य मसाले टाकून सूप सेवन केल्यास जास्त हितकारक.
  • मूग, तूर यांसारख्या डाळींचे वरण वापरावे.
  • तूप अधिक प्रमाणात खावे.
  • फोडणीसाठी भरपूर तेल वापरावे. मोहरी व हिंग यांचाही फोडणी करताना मुक्तहस्ताने वापर करावा.
  • तळलेले पदार्थ मात्र कटाक्षाने टाळावेत.
  • फळे खाताना त्यावर मिरी पूड किंवा ओव्यासारख्या मसाल्यांचा वापर करावा.
  • आहाराइतकेच विहाराला महत्त्व आहे, म्हणून दुपारी झोपू नये. रात्री जागरण करू नये.
  • रोज सूर्यनमस्कार, प्राणायामसारखा व्यायाम करावा.
    महत्त्वाची टीप ः कोणतेही सर्दी-खोकल्याचे औषध घेताना काही काळ ते तोंडात-घशात धरून ठेवावे, म्हणजे गण्डूषसारखे व थोड्या गुळण्याप्रमाणे करून नंतर ते पोटात घ्यावे, म्हणजे या औषधाचा योग्य परिणाम होतो.