नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे व विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. राणेंनी आपणाविरुद्ध सूडबुद्धीने कारवाईचा ससेमिरा चालवल्याचा आरोप लोबोंनी केला.
कळंगुट व बागा येथील आपल्या पाच हॉटेल्सची अन्न आणि औषध प्रशासनाकडून सतावणूक चालू असून, यामागे मंत्री विश्वजीत राणे यांचा हात असल्याचा आरोप लोबो यांनी केला. आपण या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही लोबो यांनी म्हटले आहे, तर राणे यांनी आपण करीत असलेली कारवाई ही कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. आपला हॉटेल व्यवसाय हा आपण आमदार बनण्यापूर्वीपासूनच असून, आपणाकडे सर्व कायदेशीर परवाने आहेत. मात्र, असे असताना आता सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप लोबो यांनी केला आहे.
डिलायला लोबो मुख्यमंत्र्यांना भेटल्या
दरम्यान, मायकल लोबो यांच्या पत्नी व शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि कळंगुट, बागा आदी ठिकाणी आपली जी वेगवेगळी हॉटेल्स व अन्य व्यवसाय आहेत, त्यासंबंधीचे सगळे परवाने रितसरपणे घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्याविरोधात सुरू केलेली कारवाई बंद करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली.