आयआयटीसाठी सांगेतील जमिनीचा प्रस्ताव : मुख्यमंत्री

0
11

>> अधिकार्‍यांच्या पाहणीनंतर अंतिम निर्णय

सांगे तालुक्यातील सुमारे ७.५० लाख चौरस मीटर जमीन आयआयटी संकुल उभारण्यासाठी देण्याचा प्रस्ताव असून, आयआयटीच्या अधिकार्‍यांनी जमिनीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यात आयआयटी संकुलासाठी सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावली येथे जमीन देण्यात आली होती. स्थानिक ग्रामस्थांनी आयआयटी संकुलाला विरोध केल्याने अखेर शेळ-मेळावली येथे आयआयटी संकुल उभारण्याचा प्रस्ताव स्थगित करावा लागला. आयआयटी संकुलासाठी काणकोण तालुक्यातील जागेचा विचार केला जात होता. आता सांगे तालुक्यातील जागेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. समाजकल्याणमंत्री तथा स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई, महसूल व शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांना आयआयटीचे अधिकारी व स्थानिक पंचायतीच्या प्रतिनिधींच्या समवेत जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली आहे.