पावसाने जोर पकडला; पुढील तीन दिवस मुसळधार

0
19

सलग दुसर्‍या दिवशी काल जोरदार पावसाने गोव्याला झोडपले. राजधानी पणजीसह विविध शहरे व ग्रामीण भागांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी राज्याला नारंगी इशारा दिला होता, त्यानुसार काल संपूर्ण दिवसभरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शनिवारीही राज्याला नारंगी इशारा देण्यात आलेला असून, २६ ते २८ जूनपर्यंत पिवळा इशारा दिलेला आहे. पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून, त्या काळात राज्यातील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात ७४.१ मिमी. एवढ्या पावसाची नोंद झालेली असून, काही ठिकाणी तर तब्बल १०० मिमी. एवढा पाऊस कोसळला.

जोरदार पावसामुळे राज्याच्या काही भागात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच वेर्णा येथे आयडीसी वेर्णा ते लोटली महामार्गाला जोडणार्‍या ‘मिसिंग लिंक’ वर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन माती व मोठे दगड या महामार्गावर आले. त्यामुळे महामार्ग रहदारीसाठी बंद झाला. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दरड रस्त्यावर कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी हा महामार्ग आता वाहनचालकांना धोक्याचा बनला आहे. कारण टेकडीवरून मोठमोठे दगड मुख्य रस्त्यावर कोसळण्याच्या मार्गावर आहे.

या घटनेची माहिती वेर्णा आयडीसी अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रस्त्यावर आलेली माती व दगड हटवून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत रस्ता मोकळा केला.