तक्रारींसाठी खासगी ई-मेलला कॉंग्रेसचा आक्षेप

0
14

>> सरकारी कामांसाठी खात्यांच्या ई-मेलचा वापर करण्याची मागणी

नगरनियोजन व वन खात्याच्या संदर्भातील तक्रारी खात्याचे मंत्री विश्‍वजीत राणे यांनी आपल्या खासगी ई-मेलवर पाठवण्यासंबंधी केलेल्या आवाहनाला कॉंग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गोवा ही कुणाची खासगी मालमत्ता नसून, सरकारी कामांसाठी सरकारी खात्यांच्या ई-मेलचा वापर केला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विश्‍वजीत राणे यांनी केलेल्या आवाहनानुसार पहिल्याच दिवशी ई-मेलवर ३५ तक्रारी मिळाल्याची त्यांनी स्वत:च ट्विटद्वारे दिली होती. त्याला अमित पाटकर यांनी आक्षेप घेत सरकारी कामांसाठी सरकारी खात्यांच्या ई-मेलचा वापर करायला हवा; मात्र असे असताना राणेंनी तक्रारी नोंदवण्यासाठी आपला खासगी ई-मेल दिला आहे, तो कसा काय, असा सवालही त्यांनी केला. अशा प्रकारे मंत्र्यांच्या खासगी ई-मेलवर तक्रारी पाठवणे चुकीचे असून, लोकांनी पोलिसांत तक्रारी कराव्यात, असा सल्लाही पाटकर यांनी दिला.

दरम्यान, नगरनियोजन व वन खात्याच्या संदर्भातील एकूण ६१ तक्रारी तीन दिवसांत आपल्याकडे आल्या असल्याचे काल मंत्री विश्‍वजीत राणे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले. डोंगरकापणी, जंगलतोड, ओडीपींसंबंधीच्या तक्रारी आपल्या ई-मेलवर पाठवाव्यात, अशी सूचना विश्‍वजीत राणेंनी राज्यातील जनतेला केली होती, त्यासाठी त्यांनी आपला खासगी ई-मेल आयडी दिला होता.

लोकांनीच पहिल्याच दिवशी ३५ तक्रारी पाठवल्या. त्यानंतरच्या दोन दिवसांत तक्रारींची संख्या वाढून आतापर्यंत ६१ तक्रारी आल्याचे राणेंनी नमूद केले. आपल्याकडे आलेल्या तक्रारींपैकी एका तक्रारीमुळे तर आपणाला आश्‍चर्याचा धक्काच बसला असून, ही तक्रार आपण खात्याकडे पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले.