पावसाची कवितेतील रूपकळा

0
180
  • – डॉ. सोमनाथ कोमरपंत

आपल्या कृषिप्रधान भारतात पावसाची किती अपूर्वाई! दरवर्षी तो नेमाने येत असला तरी तो नवीन होऊन येत असतो. पाऊसप्रियता आणि काव्यरचना, पर्जन्य आणि सृजन व पावसाळा अन् त्याचा सोहळा यांचे किती अभिन्न नाते? संस्कृतिविकासाच्या प्रक्रियेतदेखील पावसाळ्याची किती महत्ता? या पाण्याचे मनुष्यमात्राच्या गाण्यात रूपांतरण झाले यात नवल ते काय?

वर्षाकाल हा अतिशय रमणीय ऋतू. प्राणिमात्रांना तो आधार देतो. सृष्टीला या काळात नवे चैतन्य प्राप्त होत असते. माणूस, पशुपक्षी, जलचर आणि कीटक हे सारेच त्याची प्रतीक्षा करीत असतात. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यातच त्याची नांदी होते. सृष्टीची कळा बदलते. सोसाट्याचे वारे वाहायला लागतात. वृक्ष डोलायला लागतात. वृक्षांतळीचा पालापाचोळा गोल गोल गिरक्या घेत दूरवर पसरतो. आकाशात धुरकट, काळ्या-निळ्या आणि करड्या रंगांचे ढग दाटीवाटीने जमा होऊ लागतात. क्षणार्धात विजेचा लखलखाट सुरू होतो. अवकाशात तुमुल युद्ध झाल्याचा आभास निर्माण होतो. शिवाचे तांडव जणू सृष्टीत सुरू होते! आसमंतात चमत्कार होतो. पावसाचे टपोरे थेंब पृथ्वीतलावर टपटप नादनिनाद करीत यायला लागतात. वैशाखवणव्यात पाण्याला आसुसलेली वनश्री या वर्षावाने तृप्त होते. झाडाची पाने ओली होतात. दीर्घकाळ त्यांवर माखलेली धूळ नाहीशी होते. रानेवने हिरवीगार होतात. हवेत गारवा निर्माण होतो. प्राणिमात्रांची लगबग सुरू होते. सावध चित्ताने सारेजण वावरू लागतात. मातीचा गंध दरवळायला लागतो. तो हुंगावासा वाटतो. माती आणि आकाश यांची जिवाशिवाची ती भेट असते. नव्या पर्वकालाचा हा शुभारंभ. असे आभाळ भरून आले म्हणजे गहिरेपणाच्या संवेदनांनी सार्‍यांची मनेदेखील भरून येतात. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या वचनाची सार्थकता पटते. अळुमाळू येणार्‍या सुगंधाने संत्रस्त मने संतृप्त होतात. आपल्या कृषिप्रधान भारतात पावसाची किती अपूर्वाई! दरवर्षी तो नेमाने येत असला तरी तो नवीन होऊन येत असतो. पाऊसप्रियता आणि काव्यरचना, पर्जन्य आणि सृजन व पावसाळा अन् त्याचा सोहळा यांचे किती अभिन्न नाते? संस्कृतिविकासाच्या प्रक्रियेतदेखील पावसाळ्याची किती महत्ता? या पाण्याचे मनुष्यमात्राच्या गाण्यात रूपांतरण झाले यात नवल ते काय? आपल्या पूर्वजांनी तर म्हणून ठेवले आहे ः
काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी|
देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः॥

  • पाऊस वेळेवर येऊ दे. पृथ्वी धनधान्याने समृद्ध होऊ दे. हा देश दुष्काळविरहित राहो. सज्जन लोक निर्भय राहोत. पाऊसप्रियतेला येथे सर्वमंगलाची अन् उदात्ततेची जोड मिळालेली आहे. ‘रामायण’कर्त्या महाकवी वाल्मीकींची सृष्टिगानात प्रतिभा रमली. आजमितीला आपल्या मौखिक परंपरेत, आर्ष आणि अभिजात काव्यसंपदेत पर्जन्याला स्थान मिळाले आहे. कविकुलगुरू कालिदासाने आपल्या ‘ऋतुसंहार’ या काव्यातील द्वितीय सर्गात पावसाळ्यातील वनवैभवाचे अतुलनीय वर्णन केले आहे. त्याचा रसास्वाद घेताना आपल्या चित्तवृत्ती पुलकित होतात. निःशब्द होऊन त्याचे आकंठ पान करावे. संतुष्ट व्हावे.
    पर्जन्यकालीन आभाळातील मेघांच्या तांडवाचे आणि लखलखणार्‍या सौदामिनीचे समुचित शब्दांत वर्णन करताना कालिदास उद्गारतो ः
    ससीकराम्भोधरमत्तकुञ्जरस्तडित्पताकाशनिशब्दमर्दलः|
    समागतो राजवदुद्धतद्युतिर्घनागमः कामिजनप्रियः प्रिये॥
    या सर्गाच्या उपसंहारात त्याने काव्यात्मकतेचा परमोच्चबिंदू गाठलेला आहे ः
    बहुगुणरमणीयः कामिनीचित्तहारी तरुविटपलतानां बान्धवो निर्विकारः|
    जलदसमय एव प्राणिनां प्राणभूतो दिशतु तव हितानि प्रायशो वाञ्छितानी॥
    पर्जन्यऋतूला कालिदासाने ‘बहुगुणरमणीय’, ‘कामिनीचित्तहारी’ आणि ‘तरुविटपलतानां निर्विकारः बान्धवः’ या विशेषणांनी संबोधले आहे. ‘जलदसमय एवं प्राणिनां प्राणभूतः’ या उद्गाराला तर सुभाषिताची रमणीयता आणि अर्थवत्ता लाभलेली आहे. संस्कृतिसंचित जपणार्‍या जनसामान्यांच्या अंतरंगातील पावसाळ्यासंबंधीची ममत्वाची भावना येथे शब्दांकित झालेली आहे. निसर्गाचे सर्ग उलगडण्याची क्षमता कालिदासप्रतिभेत आहे. तिला पूर्वसूरींनी ‘कविताकामिनीचा विलास’ म्हटले. ते सार्थ आहे.

आधुनिक कालखंडात विदग्ध वाणीची आठवण करून देणार्‍या चंद्रशेखर या ज्येष्ठ कवीने ‘घनाभिनंदन’ ही सुरेख कविता लिहिली आहे. बालकवी तर बोलून-चालून निसर्गानुभूतीत रमणारे कवी. त्यांच्या ‘श्रावणमास’ या कवितेत आशय आणि अभिव्यक्ती यांची गळामिठी पडलेली आहे. या कवितेतील क्षणचित्रे अनुभवताना चित्रकाराच्या कुशल कुंचल्याने रेखाटलेली ती चित्रे वाटतात. ‘वरती बघतां इंद्रधनूचा, गोफ दुहेरी विणलासे…’, ‘उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा’ आणि ‘बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते’ या निवडक रंगचित्रांमधून बालकवींच्या कवितेतील विभ्रम, शब्दकळा आणि कल्पनाविलास यांची त्रिवेणी गुंफण प्रत्ययास येते. ‘पाऊस’ या कवितेत तर बालकवी कोसळणार्‍या पावसाची चित्रे सहजतेने रेखाटतात ः
थबथबली, ओथंबुनि खाली आली
जलदाली मज दिसली सायंकाळी
रंगहि ते नच येती वर्णायातें!
सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता
व्योमपटीं जलदांची झाली दाटी;
कृष्ण कुणी काजळिच्या शिखरावाणी!
नील कुणी इंद्रमण्याच्या कांतिहुनी
गोकर्णी, मिश्र जांभळे तसे कुणी
‘रात्र अशी भिजणारी’ या कवितेत निसर्गानुभूती आणि प्रेमानुभूती यांचे अद्वैत आहे. पु. शि. रेगे या कवितेत उद्गारतात ः
दिनभर भिजणारी
ही रात्र अशी कशि विसरू
माझाच प्राण तू
लटिके माझेच वासरू

तृप्त तृप्त, संतृप्त
हरवून शांत निर्मुक्त
अविचल तुजपाशी
निखळून राहते फक्त.
शंकर रामाणी यांच्या ‘पाऊस’ या कवितेत पर्जन्यदृश्यांच्या तीन अवस्था अतिशय तन्मयतेने रंगविल्या आहेत. त्यांतील हे एक क्षणचित्र ः
पाऊस ः
घाटांतला
कांबळकाळे आकाश लुचून
धुकाळ दरीत
झांजरसा,
तंद्रीतच तरंगणारा;
आषाढयात्रेच्या वाटेवर विसावून
दूरवर स्वप्नात
झांजावणारा.
कृ. ब. निकुम्ब यांच्या ‘आशय’ या कवितेत केवळ पाऊसकालीन चित्र आढळत नाही; तर कवीच्या अंतःकरणातील भावनांदोलनाशी ते एकरूप झाले आहे ः
कोसळत्या सरींची धुंद लय माझ्या नसांत घुमत आहे
मंद्र गर्जित मेघांचे स्फुरते माझ्या हृदयांतून
कडाडणार्‍या विजेंत जागतो माझ्या प्राणांचा जयघोष
सहजस्फूर्त,
काजव्यांनी लहडलेल्या रानजाळीसारखा
नटलों आहे
थेंबासरशीं उसळणार्‍या पाणफुलांच्या घोसांनी
तुषारांचे शुभ्र तुरे माझ्या पुलकांत झुलत आहेत
खळाळत्या प्रवाहांतलें केशर माझ्या रक्तांतलें.
पावसाळ्यातील निसर्गदृश्यांशी असलेले आंतरिक नाते अधोरेखित करताना कविवर्य कृ. ब. निकुम्ब म्हणतात ः
नातें माझें मन्थर, श्याम घनांशी
कडकडत्या गगनाशीं
जडलेले अनुबंध जिवाचे
कोसळत्या धारांशीं
आषाढाच्या सतत झडीशीं
श्रावणांतल्या उडत्या सोन-सरींशी
या आशयातील समरसता आणि अभिव्यक्तीतील रसमयता किती आल्हाददायी आहे.

कविवर्य बा. भ. बोरकरांच्या प्रतिभाधर्मातील एक महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे निसर्गाची त्यांनी केलेली चित्रमय वर्णने. त्यांतही पुन्हा त्यांची पर्जन्यसूक्ते! त्यातील अप्रतिम शब्दकळेचे, प्रतिमाविश्‍वाचे आणि उत्तुंग कल्पनाविलासाचे रसग्रहण करणे हा स्वतंत्र आणि सविस्तर विवेचन करण्याचा विषय. पण आवर्जून उल्लेख करावा अशा त्यांच्या पावसावरील या काही कविता-
‘सरिंवर सरी आल्या ग’, ‘जलद भरुनि आले’, ‘घन बरसे रे’, ‘क्षितिजीं आलें भरतें ग’, ‘झाले हवेचेंच दहीं’, ‘कौलारांवर लाल खेळतो’, ‘झाडें झालीं निळीं निळीं’, ‘खिडक्यांवर वाजे वारा’ आणि ‘पाऊस रात्रीं होऊन गेला’ इ.
कविवर्य अनिलांच्या ‘दशपदी’ या कवितासंग्रहात पावसाविषयीच्या लक्षणीय कविता आहेत. ‘दशपदी’ हा आपण केलेला एक रचनाप्रयोग आहे असे त्यांचे मत आहे. ‘जुई’ या कवितेत भावकोमल शब्दांची पखरण आहे. केवळ हे निसर्गचित्रण नसून सूक्ष्म स्वरूपाची प्रतीकात्मता तिच्यात सामावलेली आहे.
पावसाची सर ओसरून जाते उगाच तुषार भिरभिरती
इवल्या इवल्या फुलीं भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती
आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला
ओल्या झुळुकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला
‘श्रावणझड’ या कवितेत कवीने उत्कट अनुभूतीचे चित्रण केले आहे ः
श्रावणझड बाहेरी मी अंतरि भिजलेला
पंखीं खुपसून चोच एक पक्षि निजलेला
अभ्रांचा हृदयभार थेंब थेंब पाझरतो
विझलेला लांब दिवस चिंब होत ओसरतो
उथळ उथळ पल्वलांत संगळून जळ बसते
क्षणजीवी वर्तुळांत हलकेसे भासविते
चळते प्रतिबिंब जरा स्थिर राहुन थिजताना
बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना
झिमझिम ही वार्‍यासह स्थायी लय धरून असे
संमोहन निद्रेतुन शब्दांना जाग नसे.
कृषिसंस्कृती हेच जिचे जीवन आहे आणि अहर्निश शिवारात राबणारी बहिणाबाई चौधरी उत्स्फूर्तपणे उद्गारते ः
आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस
आता सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी
१९६० नंतरच्या कवितेत नवी संवेदनशीलता व्यक्त झाली. ग्रेस, ना. धों. महानोर, वसंत सावंत, शंकर वि. वैद्य, अनुराधा पोतदार, केशव मेश्राम इत्यादींचे कवितासंग्रह ‘पॉप्युलर प्रकाशन’ने ‘नवे कवी… नवी कविता’ या मालिकेत प्रसिद्ध केले. यांतील बहुतांश कवींनी आपल्या कवितेत निसर्गाचे चित्रण केले आहे. त्यांनी पावसावरील कविता लिहिल्या. महानोरांनी निसर्गकविता आपल्या आगळ्या-वेगळ्या प्रतिमासृष्टीने समृद्ध केली. उदा.
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये कशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे निसर्गाशी असलेले नाते सर्वश्रुत आहे. पहिल्या हिरव्या तृणपात्याचा सत्कार करीत असताना कवी उद्गारतो ः
मातीची ही मात मृत्युवर
मृत्युंजय श्रद्धेचा अंकुर
हा सृजनाचा विजयध्वज, हा जीवनसाक्षात्कार
पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार
त्यांनी सौंदर्योपासक वृत्तीने टिपलेली पावसाची चित्रे अनुभवताना आनंदाची लहर तरळते.
‘देवाचा पाऊस’ या कवितेत ग्रेस पर्जन्यानुभूतीचे निखळ सुंदर चित्र रेखाटतात ः
काय देवाची करणी
अस्सा असतो पाऊस?
कधी राणीची पालखी
कधी राजाचा उरूस?
आरती प्रभूंच्या ‘ये रे घना, ये रे घना| न्हाऊ घाल माझ्या मना’ ही आर्त हाक हृदयाला भिडते.
मराठीतील निसर्गकवितेची पाऊलवाट समृद्ध करणार्‍या चित्रकार आणि कवी असलेल्या प्रतिभावंत नलेश पाटील यांच्या कवितेचा थोडक्यात परामर्श घेऊन इथे थांबायचे आहे. नलेश पाटील मराठी काव्यक्षितिजावर झळकले. अल्पकाळात त्यांनी आपली उज्ज्वल प्रतिमा निर्माण केली आणि क्षणार्धात लौकिक जगातून ते निघून गेले. त्यांच्या कवितेत शब्दकळेची लय आणि अर्थवत्तेची लय यांची समतानता आढळते. त्यांच्या कवितेच्या आशयात कोमल, ओल्या अक्षरांचा स्वरमेळ आहे. त्याची धूत अंतर्मनात घुमत राहते. साध्यासुध्या शब्दांत ते अमूर्त शिल्प निर्माण करतात ः
झाड बोले झाडा भटकुनीं येऊ चल
ऐकताच वार्‍याचंही चित्त झालं ओलं…
ऐकुनी मुसळधार अनावर बोल
डोंगराचं दार झर्‍यासाठी उघडलं
घाटामध्ये रंगलेला खेळ बघू चल
वाटेच्या घसरगुंडीवरी रानफुले…
पावसाचं अंग मातकट रंगलेलं
इंद्रधनुष्याला मात्र नभीं टांगलेलं…
आभाळाच्या संगीताला पावसाची चाल
सृष्टीनेही गंधर्वाचं रूप घेतलेलं
पाहुनी देवाला असं साक्षात आलेलं
गवताचं पातं नतमस्तक झालेलं…

  • या चित्राकडे एकटक पाहताना अबोध राहण्यापलीकडे आपण काय करू शकतो? कवीने तर आनंदाची परिसीमा गाठलेली…