>> एसआयटीने केलेल्या संशयित विक्रांत शेट्टी याच्या तपासात माहिती झाली उघड
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या खास तपास पथकाने (एसआयटी)े बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री, हस्तांतर प्रकरणी केलेल्या चौकशीत संशयित विक्रांत शेट्टी याने उत्तर गोव्यातील ६०-७० जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरित केल्याचे उघड झाले आहे.
राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी हडप करून त्या विकण्याच्या प्रकरणात एक टोळी कार्यरत असल्याने याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे.
एसआयटीने बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हस्तांतरप्रकरणी अटक केलेल्या विक्रांत शेट्टी याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला आहे. संशयित विक्रांत याला शनिवार दि. १८ जून रोजी उत्तर गोव्यातील एका बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली होती.
एसआयटीने बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री, हस्तांतराच्या दोन प्रकरणांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. विक्रांत शेट्टी याचा जमीन विक्री करण्यात समावेश असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. एसआयटीला संशयित विक्रांत शेट्टी याच्याकडून धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. संशयित विक्रांत याने उत्तर गोव्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ६० ते ७० जमिनी हडप करून त्या ग्राहकांच्या नावे केल्या आहेत, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
सीएमओ कार्यालयाकडून बनावट कागदपत्राच्या आधारे जमीन हडप करणे व त्यांची विक्री केल्याप्रकरणी सुरू करण्यात आलेल्या चौकशीचे मॉनिटरींग केले जात आहे. या जमीन हडप करण्याच्या प्रकरणात काही सरकारी अधिकारी गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री व अवैधपणे जमीन हडपल्याच्या प्रकरणाची चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता या प्रकरणी एसआयटीने पहिली कारवाई करत घोगळ-मडगाव येथील संशयित विक्रांत शेट्टी याला अटक केली. शेट्टी याने आसगाव-बार्देशमधील जमीन बनावट कागदपत्रांद्वारे हडपल्याचा त्याच्यावर आरोप असून, त्या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीने त्याला अटक केली.
दरम्यान, नागरिकांनी बेकायदा जमीन हडपणेविषयक आणि हस्तांतरण प्रकरणाच्या तक्रारींसाठी एसआयटीकडे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केले आहे.