>> प्रकल्पाविरोधातील रॅलीत स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग
बायंगिणी जुने गोवे येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी एक रॅली काल काढली. या रॅलीत कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सहभाग घेऊन प्रस्तावित कचरा प्रकल्पाला विरोध असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारने बायंगिणी कचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेऊन नियोजित कचरा प्रकल्प अन्य ठिकाणी हालविण्याची मागणी आमदार फळदेसाई यांनी केली.
बांयगिणी जुने गोवा येथील नियोजित कचरा प्रकल्पाचा विषय गेल्या कित्येक वर्षांपासून गाजत आहे. जुने गोवे येथील ग्रामस्थांकडून या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध केला जात आहे. सरकारी यंत्रणेकडून या विरोधाला डावलून कचरा प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्याजवळ ऐतिहासिक वारसास्थळ, विद्यालय, इस्पितळ, देवालय, निवासी वस्ती आहे. जुने गोवा या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे कचरा प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री, कचरा व्यवस्थापन मंत्र्यांची भेट घेऊन बायंगिणी कचरा प्रकल्पाच्या आसपासच्या परिस्थितीची जाणीव करून देणार आहे, असे आमदार फळदेसाई यांनी सांगितले.
जुने गोवे आणि कुंभारजुवा मतदारसंघातील नागरिक युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ जाहीर केलेल्या परिसरात कचरा प्रक्रिया प्रकल्प होऊ देणार नाही. आपण नागरिकांच्या सोबत राहणार आहे, असेही आमदार फळदेसाई यांनी सांगितले. कचरा प्रकल्पाच्या विरोधातील रॅलीत जुने गोव्यातील माजी पंच सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.