>> बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणामध्ये हिंसाचार; रेल्वेंची जाळपोळ
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. तरुणांच्या असंतोषामुळे केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेत या योजनेंतर्गत वयोमर्यादा २१ वरून २३ वर नेली; मात्र यानंतरही बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणासह अन्य राज्यांत सलग तिसर्या दिवशी आंदोलक रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलकांनी काही ठिकाणी रेल्वेंना आग लावली, तर काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली. दरम्यान, विरोध होत असला, तरी हवाई दलातील भरती प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होणार आहे, असे हवाई दल प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी जाहीर केले आहे.
उत्तर प्रदेशातील बलियामध्ये जमावाने रेल्वेला आग लावली. अलिगड आणि आग्रा येथे आंदोलकांनी दगडफेक केली. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर आणि इंदोर येथे आंदोलन झाले. तसेच बिहारमधील मोहीउद्दीनगर स्थानकावर उभ्या जम्मू-तावी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लावण्यात आली. बिहारमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
तेलंगणातील पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू
अग्निपथ योजनेविरोधातील हिंसाचाराचे लोण आता तेलंगणापर्यंत पोहचले असून, हैदराबादमध्येही तरुणांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. तसेच सिकंदराबाद येथे रेल्वे स्थानकातील रेल्वेच्या तीन डब्यांना आग लावली. त्यानंतर हिंसाचार एवढा भडकला की, रेल्वे पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला, त्यात एकाचा मृत्यू झाला.