पंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रशासक नियुक्तीबाबत निर्णय : गुदिन्हो

0
23

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ १९ जून २०२२ रोजी पूर्ण झाल्यानंतर पंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल येथे दिली.

राज्य सरकारकडून राज्यातील १८६ ग्रामपंचायतींची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी समाजाला आरक्षण आणि पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलली जात आहे. या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ १९ जून रोजी पूर्ण होत आहे; मात्र राज्य सरकारकडून ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंच की सरकारी अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती योग्य वेळी केली जाणार आहे, असे मोघम उत्तर माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिले.