>> केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पणजीत घोषणा
>> केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाची बैठक
गोव्यात प्रत्येक तालुक्यात दोन आदर्श अंगणवाड्या, नवीन ६० अंगणवाड्या आणि दक्षिण गोव्यात पीडितांना मदत करण्यासाठी एक मदत केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना येथे काल दिली.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या येथे आयोजित पश्चिम उपविभागीय बैठकीनंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बोलत होत्या. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे महिला व बाल कल्याण मंत्री विश्वजित राणे, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाचे सचिव इंद्रवीर पांडे, गोवा सरकारच्या महिला व बालकल्याण खात्याचे सचिव वाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवचे प्रतिनिधी आणि महिला व बालकल्याण खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती होती.
गोवा राज्याच्या मुक्तीला साठ वर्षे पूर्ण होत असल्याने नवीन साठ अंगणवाड्या सुरू करण्यात येणार आहेत, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री इराणी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात महिला व बालकल्याण मंत्रालयाने केलेल्या कार्याचा आढावा केंद्रीय मंत्री इराणी यांनी घेतला. देशातील महिला आणि मुलांच्या विकासासाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या सॅनिटरी पॅड योजनेचा देशभरातील महिलांना लाभ मिळवून दिला जात आहे, असेही केंद्रीय मंत्री इराणी यांनी सांगितले.
गेल्या ८ वर्षांत केलेल्या प्रशासनातील सुधारणा कामगिरीतून दिसून येत आहेत. ’बेटी बचाओ-बेटी पढाओ’ हे आठ वर्षांतील सर्वांत मोठे यश आहे. ’जन औषधी’ केंद्राच्या माध्यमातून महिलांना १ रुपयात सॅनिटरी पॅड मिळत आहे. यामुळे देशातील ग्रामीण भागातील आरोग्याची गती बदलली आहे, असे डॉ. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले.
राज्यात दोन अत्याधुनिक अंगणवाड्या, नवीन ६० अंगणवाड्या आणि मदत केंद्राच्या घोषणेचे राज्याचे महिला व बालकल्याणमंत्री विश्वजित राणे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील महिला व बाल विकासाला आणखी चालना मिळण्यास मदत होणार आहे. राज्यात सुमारे १२६२ अंगणवाड्या आहेत. त्यातील ७०० अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत चालविण्यात येत आहेत.
अंगणवाडीच्या भाडेपट्टीसाठी खर्च मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे भाड्याच्या खोलीतील अंगणवाडीमध्ये जास्त सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकत नाही. काही अंगणवाड्या सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
या बैठकीत लहान वयात आपले पालक गमावलेल्या काही मुलींनी सहभाग घेतला. त्यांचे शिक्षण सुरू असून त्यांपैकी अनेकांनी मंत्रालयाच्या विविध योजनांद्वारे मदत घेतली होती. या मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांना आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. तर, काहींना शिक्षक बनायचे आहे.
मुलींची स्वप्ने साकार करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. ’बेटी बचाओ बेटी पढाओ’मुळे मुलींंना निर्भयपणे पुढे जाण्यास मदत झाली आहे, असेही केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.