जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे शनिवारपासून सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये आज आणखी दोन दहशतवादी मारले गेले आहेत. एकूण तीन दहशतवाद्यांना आतापर्यंत ठार करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारूगोळा तसेच काही आक्षेपार्ह साहित्य होते हे सर्व जप्त करण्यात आले आहे असे म्हटले आहे.
मारले गेलेले तिन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. त्यापैकी एकाचे नाव जुनैद असे आहे. त्याने १३ मे रोजी लष्करी अधिकारी रियाझ अहमद यांची हत्या केली होती. तर फाजिल अहमद भट आणि इरफान अहमद मलिक अशी इतर मारले गेलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. कुलगाम येथील सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी सर्वप्रथम चकमक सुरू असलेल्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्याची खात्री केली. यानंतर झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.