खड्डे दुरुस्तीसाठी एजन्सीची नियुक्ती

0
14

>> मंत्रिमंडळाची मान्यता; मंत्री काब्राल यांची माहिती

राज्यातील रस्त्यांवर पावसाळ्यात पडणार्‍या खड्‌ड्यांच्या दुरुस्तीसाठी एजन्सीच्या नियुक्तीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

या एजन्सीकडून २ अत्याधुनिक जॅट पॅचर यंत्राच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्‌ड्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. या एजन्सीकडून खड्‌ड्यांच्या दुरुस्तीची १८ महिन्यांची हमी दिली जाणार आहे. राज्यातील रस्त्यांवरील खड्‌ड्यांची माहिती मिळविण्यासाठी खास ऍप तयार केला जात आहे. नागरिक रस्त्यावरील खड्‌ड्यांबाबत ऍपच्या माध्यमातून माहिती देऊ शकतात, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती रखडल्याने अधिकार्‍यांची कमतरता जाणवत आहे. बांधकाम खात्यातील नोकरभरतीचे प्रकरण दक्षता खाते आणि न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे नोकरभरतीची प्रक्रिया अडकून पडली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पीडब्लूडीतील अडकून पडलेल्या नोकरभरतीमध्ये लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे. नोकरभरतीअभावी अधिकार्‍यांच्या बढत्या सुध्दा प्रलंबित आहेत, असेही काब्राल यांनी सांगितले.

राज्यातील रस्त्यावरील खोदकामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी खास ऍप कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर विविध कामासाठी खोदकाम केले जात असल्याने विविध खात्याच्या कामकाजात ताळमेळ नसल्याचे आढळून येत आहे. या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ऍपची मदत घेतली जाणार आहे. डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर किमान दोन वर्षे खोदकाम करण्यास मान्यता दिली जाणार नाही, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.
झुआरी नदीवरील चौपदरी पुलाची एक मार्गिका जुलैच्या अखेरपर्यंत वाहतुकीला खुली करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.